परिवहन महामंडळ दिव्यांगांवर मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:35 PM2019-03-10T23:35:19+5:302019-03-10T23:36:03+5:30
सुरक्षीत प्रवासाची विश्वसनीय सेवा देत असलेले राज्य परिवहन महामंडळ प्रवासी सुविधेसाठी विविध सोयी व सवलती उपलब्ध करवून देते. अशातच महामंडळ दिव्यांगांवर चांगलेच मेहरबान दिसून येत असून महामंडळाने दिव्यांगांना आता शिवशाहीत प्रवासासाठी चक्क ७५ टक्के सूट दिली आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सुरक्षीत प्रवासाची विश्वसनीय सेवा देत असलेले राज्य परिवहन महामंडळ प्रवासी सुविधेसाठी विविध सोयी व सवलती उपलब्ध करवून देते. अशातच महामंडळ दिव्यांगांवर चांगलेच मेहरबान दिसून येत असून महामंडळाने दिव्यांगांना आता शिवशाहीत प्रवासासाठी चक्क ७५ टक्के सूट दिली आहे. ७ मार्चपासून या नव्या निर्णयाची अंमलबजवणी झाली असून या निर्णयामुळे दिव्यांगबांधवांची एकप्रकारे लॉटरीच लागली आहे.
‘कशाला करता विषाची परीक्षा-एसटी बरी खाजगी पेक्षा’ ही म्हण एसटीच्या प्रवासाला घेऊन चांगलीच प्रचलीत आहे. या म्हणीनुसारच बहुतांश प्रवासी एसटीनेच प्रवास करण्यास प्राथमिकता देतात. यामुळेच दुर्गम अशा गावांतही परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ मोठ्या दिखामात शिरून आपली सेवा देत आहे. त्यातल्या त्यात प्रवाशांचा प्रवास अधीक सुखद करता यावा यासाठी महामंडळाने ‘शिवशाही’ आणली. अत्यंत आरामदायक असलेल्या या बसेस लांबवरच्या प्रवासासाठी अत्यंत सुविधाजनक आहेत. मात्र ‘शिवशाही’चे दर जास्त असल्याने साधारण प्रवासी ‘शिवशाही’चा प्रवास टाळत होता.
प्रवाशांना प्रवासासाठी वेगवेगळया सुविधा देतानाच महामंडळ मात्र दिव्यांगांवर चांगलेच मेहरबान दिसून येत आहे. दिव्यांगांना प्रवासात सुविधा असतानाच आता मात्र त्यांना थेट ‘शिवशाही’त प्रवासासाठी ७५ टक्के सूट दिली आहे. म्हणजेच, दिव्यागांना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत लागणाऱ्या दराच्या ७५ टक्के दर कमी केले जाणार आहे.एकंदर फक्त २५ टक्के तिकीट दर भरून दिव्यांग बांधव ‘शिवशाही’चा सुखकर प्रवास उपभोगू शकतील. महामंडळाचा हा नवा निर्णय ७ मार्चपासून लागू करण्यात आला आहे.
शिवशाहीचा प्रवास झाला स्वस्त
राज्य परिवहन महामंडळाकडून लालपरीच्या तुलनेत शिवशाहीचा प्रवास महागडा होता. यामुळे साधारण व्यक्ती शिवशाहीचा प्रवास करणे टालत होते. परिणामी शिवशाही तोट्यात होती. हेच कारण हेरून, महामंडळाकडून काहीच दिवसांपूर्वी शिवशाहीचे दर कमी करून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार असे करण्यात आले. त्यात आता दिव्यांगांना लालपरीप्रमाणेच शिवशाहीतही ७५ टक्के सूट मिळाल्याने शिवशाही आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.