खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:20 PM2018-07-12T22:20:15+5:302018-07-12T22:21:10+5:30
विना परवाना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शहरातील १२ वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी (दि.१२) जप्तीची कारवाई केली. यामुळे खासगी वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विना परवाना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शहरातील १२ वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी (दि.१२) जप्तीची कारवाई केली. यामुळे खासगी वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.
विद्यार्थ्यांची घरापासून शाळेत आणि शाळेपासून घरापर्यंत सुरक्षित वाहतूक करण्यासाठी परवानाधारक स्कूल बसमधून वाहतूक करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे. तसेच खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्यास त्याची माहिती शालेय प्राधिकरणाने संबंधित विभाग आणि न्यायालयाला देण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची खासगी वाहनातून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. काही पालक सुध्दा थोडे पैसे वाचविण्याच्या नादात खासगी वाहन लावून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवितात. मात्र या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना नसल्याने एखाद्या वेळेस अपघात घडल्यास मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनासाठी नियमावली तयार केली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने या वाहनाना विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी परवाना देताना सर्व गोष्टींची चाचपणी करुनच परवाना देण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या शालेय प्राधिकरणाने खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला देण्याचे निर्देश दिले आहे. महिनाभरापूर्वीच शाळांच्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. या दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात विना परवाना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू होती. उपप्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवून विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी १२ खासगी वाहने जप्त केली. या कारवाईमुळे विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.
तीन महिन्यांसाठी वाहनाचा परवाना निलबिंत
विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया १२ खासगी वाहनावर जप्ती कारवाई करुन या वाहनाचा परवाना तीन महिन्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने निलबिंत केला. त्यामुळे जप्त केलेली सर्व वाहने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर जप्तीची धडक कारवाई केली जात आहे.पालकांनी सुध्दा आपल्या पाल्यांना परवाना नसलेल्या खासगी वाहनातून शाळेत पाठवू नये. तसेच शाळांनी सुध्दा याची काळजी घ्यावी.
- विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन गोंदिया.