राज्य मार्गाचा प्रवास खड्ड्यातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:55 AM2018-05-12T00:55:26+5:302018-05-12T00:55:26+5:30

रस्त्यांवरुन त्या राज्यातील प्रगती आणि विकासाची ओळख होते. मात्र गोंदिया जिल्ह्या लगत असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या रस्त्यांची अंत्यत दुर्दशा झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरूस्तीच न केल्याने राज्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा प्रवास खड्डयातून सुरू आहे.

Travel to the state road from the pit | राज्य मार्गाचा प्रवास खड्ड्यातून

राज्य मार्गाचा प्रवास खड्ड्यातून

Next
ठळक मुद्देरस्त्यांची स्थिती जैसे थे : वाहन चालकांचे हाल, शासनाचे मौन

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : रस्त्यांवरुन त्या राज्यातील प्रगती आणि विकासाची ओळख होते. मात्र गोंदिया जिल्ह्या लगत असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या रस्त्यांची अंत्यत दुर्दशा झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरूस्तीच न केल्याने राज्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा प्रवास खड्डयातून सुरू आहे.
सालेकसा तालुका हा महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर असून महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या सीमेवर आहे. भौगौलिकरित्या जोडणाराच नव्हे तर तिन्ही राज्यातील सीमेलगत वास्तव्यास असणाऱ्या लोकांच्या मनोमिलन करणारा आणि अतूट नाते जोडणारा हा तालुका आहे. परंतु या तिन्ही राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या इतर राज्यात जाणाऱ्या रस्त्यांची ६० वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही डागडूजी करण्यात आली नाही.
त्यामुळे या मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या खड्डयातून वाहन चालकांचा प्रवास सुरू आहे. या रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा पुढे आली.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आली नसल्याने रस्त्यांची हालत अधिकच खस्ता झाली आहे.
याचा फटका या सीमेलगत असणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. राजकीय दृष्ट्या विचार केला तर या तिन्ही राज्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. तर या सरकारचा सर्वाधिक भर रस्त्यांच्या कामावर आहे. मात्र असे असताना या तीन्ही राज्याला जोडणाऱ्या रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सरकारचे रस्ते विकासाचे दावे देखील फोल ठरले आहे. राज्य मार्गाची दुरूस्ती करण्याची आठवण येणार याकडे लक्ष आहे.
रेकार्डवर पक्क्या रस्त्यांची नोंद
महाराष्ट्र शासनाची कामगिरी रस्ते बांधणीच्या बाबतीत समाधानकारक मानली तरी अनेक रस्ते असे आहेत की ज्यांची नोंद शासनाच्या रेकार्डवर पक्के रस्ते म्हणून नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात त्या रस्त्यावरुन प्रवास केला तर ते रस्ते मागील कित्येक वर्षांपासून या रस्त्यांची दुरूस्तीच करण्यात आली नाही. काही मार्ग खडीकरणाचे तर काही मार्ग केवळ मुरुमाचे आहेत. त्यामुळे रेकार्डवर पक्या रस्त्यांची नोंद करुन प्रत्यक्षात कच्चे रस्ते तयार करुन यात मोठ्या प्रमाणात गोलमाल केल्याचे चित्र आहे.
या मार्गांना दुरूस्तीची प्रतीक्षा
चांदसूरज ते बोरतलाव दरम्यान महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणारा मार्ग असून हा राज्य महामार्ग आहे. परंतु या मार्गाची अवस्था सुध्दा दयनीय झाली आहे. चांदसूरज सीमा पार केल्यानंतर छत्तीसगड राज्यात प्रवेश करताना खडतर मार्गावरुनच जावे लागते. याशिवाय छत्तीसगड राज्यात प्रवेश करण्यासाठी काही रस्ते आहेत. परंतु ते सर्व रस्ते अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात आहे. त्यामुळे हे मार्ग दुरूस्ती करण्याची गरज आहे.
या गावातून जातो राज्य मार्ग
सालेकसा तालुक्याच्या उत्तरेकडील सीमेला मध्यप्रदेशचा लांजी तालुका लागून असून काही गावे थेट जुळली आहेत. तर काही गावांच्या मध्ये बाघ नदी दोन राज्यांना विभाजीत करणारी ठरते. यात नवेगाव-घसा, पिपरिया-रिसेवाडा, खेडपार-बहेला, बाम्हणी-चिचेवाडा, कोटजमूरा-टेकेपार आदी गावे नदी पार करताना दोन राज्यांना जोडते. साकरीटोला-कुलपा, कावराबांध-परसवाडा, पोवारीटोला-चिचामटोला आणि इतर गावे सरळ मार्गाने दोन राज्यांना जोडतात. परंतु या प्रत्येक गावांच्या दरम्यान गेलेले रस्ते कच्चे स्वरुपात माती मुरुमाचे किंवा खडीकरणाचे बनलेले आहेत.
राज्यांमध्ये समन्वयाचा अभाव
तिन्ही राज्यामध्ये शासन प्रशासन स्तरावर समन्वय साधण्याची मोठी गरज आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासन मध्यप्रदेशकडे तर मध्यप्रदेश महाराष्ट्राकडे बोट दाखवित जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा दोन्ही तिन्ही राज्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सरकार होते. परंतु आता एकाच पक्षाचे सरकार तिन्ही राज्यात असताना सुध्दा रस्त्यांची स्थिती बिकट आहे. त्यामुळे या तीन्ही राज्यात अद्यापही समन्वयाचा अभाव आहे.

Web Title: Travel to the state road from the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.