सौजन्याची वागणूक द्या

By admin | Published: May 29, 2017 02:01 AM2017-05-29T02:01:23+5:302017-05-29T02:01:23+5:30

जेष्ठ नागरिकांना आयुष्याच्या मावळतीला सन्मानजनक वागणूक मिळावी. त्यांच्या कोणत्याही कार्यात अडचणी निर्माण होऊ नयेत.

Treat courtesy | सौजन्याची वागणूक द्या

सौजन्याची वागणूक द्या

Next

ज्येष्ठ नागरिकांची मागणी : परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जेष्ठ नागरिकांना आयुष्याच्या मावळतीला सन्मानजनक वागणूक मिळावी. त्यांच्या कोणत्याही कार्यात अडचणी निर्माण होऊ नयेत. त्यांना कोणतेही अधिकचे कष्ट होऊ नये यासाठी शासनाच्या विविध विभागामार्फत विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामधीेल एक योजना म्हणजे एसटीमधील प्रवास. त्या प्रवासाचा लाभ जेष्ठ नागरिक घेत असले तरी परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करताना त्यांना अनेकदा वाईट अनुभवातून सामोरे जावे लागत आहे.
शासनाच्या विविध विभागामार्फत जेष्ठ नागरिकांना सोयी-सवलती देऊन, त्यांचा आदर करून मान वाढविण्याचा प्रयत्न असताना परिवहन मंडळाच्या साकोली आगारातून सुटणाऱ्या साकोली-केशोरी या बसफेरीमधून प्रवासा दरम्यान जेष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक किंवा सौजन्याची वागणूक दिली जात नाही. उलट अरे बुढ्या तुझी सवलत पास किंवा निवडणूक ओळखपत्र लवकर दाखव, तू किती वयाचा आहेस, तुझ्याजवळ चिल्लर पैसे असतील तर बसमध्ये चढ अन्यथा चढू नको. हात थरथरत जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र, पास काढण्यास विलंब होतो. मात्र वाहक मोठा आवाज चढवून बोलण्यास विसरत नाही. अर्थात सर्वच वाहक असे वागतील, असे नाही. काही वाहक चांगलेसुध्दा असल्याची त्यांनी सांगितले.
जेष्ठ नागरिकांना वेळोवेळी अपमानजनक वागणूक मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यांना वाहकाचे किंवा चालकाचे नाव माहीत आहेत काय? असे विचारले असता, त्यांना नाव विचारणे सोडाच एसटीच्या आतमध्ये घेवून दुरवर कुठेही सोडून देण्याच्या भीतीमुळे नाव विचारू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. सर्वच जेष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. स्वबळावर उत्पन्नाची अत्यल्प कमी प्राप्ती होत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असते. त्यांच्यावर मोठा आवाज चढवून तिकीटच्या पैशाची मागणी करणे, हीदेखील त्यांच्यासाठी अपमानजनक बाब ठरू शकते. हे परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांनी समजण्याची गोष्ट आहे.
यावरून परिवहन मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सभ्यतेचे व सौजन्यशीलतेचे पाठ शिकविण्याची गरज आहे. चालक व वाहकांविषयी जेष्ठ नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. याकडे परिवहन मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जेष्ठ नागरिकांना एसटीच्या चालक वाहकांकडून सौजन्याची वागणूक मिळण्याची मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे.

- बसच्या प्रवासात अपंग सोसतात हालअपेष्टा
महामंडळाच्या बसगाड्यात अपंगांकरिता जागा निश्चित केल्या आहेत. प्रवासादरम्यान त्यांना त्रास होऊ नये यासाठी जागा राखीव केली आहे. मात्र या जागेवर प्रवाशांकडून जागा बळकावण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान अपंग व्यक्तींना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात बसमध्ये गर्दी असते. अशात महिला व अपंगांना उभे राहूनच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळते. ‘केवळ महिलांसाठी, अपंगांसाठी राखीव’ लिहिलेल्या आसनावर त्यांना बसविण्याचे सौजन्य वाहकाकडून दाखविले जात नाही. यामुळे आरक्षणाचा हेतू साध्य होताना दिसत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आमदार, खासदार, अपंग, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. सीटच्या मागे व खिडकीजवळ सदर जागा राखीव असल्याची सूचना लिहीलेली असते. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वाहकांची असते. परंतु त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकावर बस येताच खिडकीतून जागेवर रूमाल, बॅग अशा वस्तू टाकून जागा आरक्षित केली जाते. मात्र अपंग व्यक्तींना हे शक्य होत नाही. परिणामी, बसमध्ये चढल्यानंतर गर्दीमुळे अपंगांना उभे राहुन प्रवास करावा लागतो. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. या नियमांच्या अंमलबजावणीकरिता वाहकांना सूचना देऊन प्रवाशांना सहकार्य करण्याची मागणी अपंग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Treat courtesy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.