मुलींनाही मुलांच्या बरोबरीने वागवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:03 AM2018-03-10T01:03:12+5:302018-03-10T01:03:12+5:30
वंशाचा दिवा, म्हातारपणाचा आधार म्हणून मुलांना उच्च शिक्षण व समृद्ध करण्याची समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणारी आहे, असा समाजाचा गैरसमज आहे. मुलींनाही उच्च शिक्षण देऊन ती स्वत:च्या पायावर उभी राहील, ....
ऑनलाईन लोकमत
अर्जुनी मोरगाव : वंशाचा दिवा, म्हातारपणाचा आधार म्हणून मुलांना उच्च शिक्षण व समृद्ध करण्याची समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणारी आहे, असा समाजाचा गैरसमज आहे. मुलींनाही उच्च शिक्षण देऊन ती स्वत:च्या पायावर उभी राहील, अशी वागणूक मिळायला हवी. मुलगी माहेरी व सासरी अशा दोन्ही ठिकाणी रममान होऊन ती कुटुंबाचा आधार बनते. मुलगा-मुलगी असा भेदभाव करु नका. दोघांनाही बरोबरीने वागवा, असे मत सेवानिवृत्त प्राचार्य मंजुषा चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
स्थानिक प्रसन्न सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
उद्घाटन नवेगावबांध येथील आर.पी. पुगलिया महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रितू राणा (सावजी नागपूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज इंजिनियरिंग अॅण्ड रिसर्च नागपूरच्या प्रा. दिव्या चंद्रिकापुरे, पं.स. सदस्य सुशीला हलमारे, नगरसेविका उर्मिला जुगनाके, नवेगावबांधच्या मनिषा तरोणे, चित्रलेखा मिश्रा, मालन दहीवले, अरुणा मेश्राम, माधुरी पिंपळकर, वनिता मेश्राम उपस्थित होत्या.
चंद्रिकापुरे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांच्या संरक्षणार्थ कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे. महिलांच्या अनेक कौटुंबिक समस्या असतात. त्या चव्हाट्यावर येण्यापूर्वीच त्यांचा सोक्षमोक्ष लागावा, या दृष्टीने महिला अन्याय-अत्याचार समितीची स्थापना करुन वेळीच निराकरण झाले पाहिजे. महिलांनी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी शिक्षणाची कास धरावी. जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात महिला अबला नको तर ती सबला बनली पाहिजे. शासनानेही महिला सबलीकरणाकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात महिलांविषयक कायद्याची जनजागृती, प्रचार व प्रसार झाला पाहिजे. जेणेकरुन महिलांना आपले अधिकार व कर्तव्याची जाणीव होईल. कायद्याच्या या माहितीमुळे ती आणखीच प्रगल्भ होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मंगला गडकरी यांनी स्त्रियांसमोरील आव्हाणे, भ्रूणहत्या, महिलांवरील अन्याय व अत्याचार याविषयी परखड भूमिका मांडून मार्गदर्शन केले.
मुलींच्या विकासाकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. मुलीच्या मनात भीतीचे भाव बालवयापासूनच रुजविले जातात. त्यांना निर्भयतेने जागवून खंबीरपणे तिच्या पाठीशी राहा. स्त्री ही स्त्रीचीच वैरी असते. सासू हीसुद्धा एक महिलाच असते. तरी सुद्धा सासू व सूनांमध्ये मतभेद निर्माण होऊन वाद कसे विकोपाला जातात. मुलींना अबोल ठेवू नका, येणाऱ्या समस्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य तिच्यात निर्माण करा. स्त्रिचा मानसन्मान ठेवण्याचे तिला धडे द्या, असे म्हणाल्या.
डॉ. रितू राणा सावजी यांनी काही घडलेल्या घटनांचे दाखले दिले. त्यांनी मुलींचा विकास तसेच महिलांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.
संचालन इंद्रकला रामटेके यांनी केले. आभार पद्मजा मेंहदळे यांनी मानले. कार्यक्रमात शेकडो महिला उपस्थित होत्या.