वृक्ष प्राधिकरणाची दोन वर्षांपासून प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 09:50 PM2017-10-23T21:50:40+5:302017-10-23T21:51:05+5:30
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड ही ग्रामीण नव्हे तर शहरी भागात देखील तेवढीच महत्त्वाची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड ही ग्रामीण नव्हे तर शहरी भागात देखील तेवढीच महत्त्वाची आहे. शहरात व्यापक स्वरुपात वृक्षारोपण करता यावे, शहर हिरवेगार व्हावे, यासाठी स्थानिक नगर परिषदेने दोन वर्षांपूर्वी वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. त्याला आमसभेने मंजुरी दिली होती. मात्र अद्यापही वृक्ष प्राधिकरण समितीचीे स्थापना करण्यात आली नाही.
शहरातील वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे. परिणामी पर्यावरणाचे संतुलन ढासळले. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमावर भर दिला जात आहे. याच दृष्टीने शासनाच्या २० सप्टेबर २०१४ च्या निर्णयानुसार ट्री प्रिजर्वेशन अॅन्ड प्रोटेक्शन अॅक्ट १९७५ नुसार शहरातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. यानंतर स्थानिक नगर परिषदेने ११ आॅगस्ट २०१५ च्या आमसभेत वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निणर्याला दोन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही सदर समिती गठीत करण्यात आली नाही.
वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एम.मेश्राम यांनी नगर परिषद मुख्याधिकाºयांना पत्र देऊन संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत करण्याबाबतचे पत्र दिले होते. मात्र त्यावर सुध्दा कुठलीच कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. नगर परिषद मुख्याधिकाºयांनी अद्यापही पर्यावरण संवर्धनाच्या मुद्दा गांर्भियाने घेतला नसल्याचे चित्र आहे.
संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे दुर्लक्ष
शहरी भागातील वन आणि वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी एक सयुंक्त वन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात येणार होती. या समितीचे पदसिध्द अध्यक्ष उपवनसंरक्षक राहणार होते. यात नगरसेवक, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक, दोन महिला प्रतिनिधी, पर्यावरण क्षेत्रातील दोन सदस्य, स्वंयसेवी संस्थाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे. ही समिती गठीत करण्याकडे सुध्दा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
मुख्याधिकाºयांचे लक्ष केवळ सुभाष बागेकडे
शहरात सर्वत्र वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे होते. मात्र नगर परिषद मुख्याधिकारी पाटील यांचे लक्ष केवळ सुभाष बागेकडे असल्याचे चित्र आहे. या बागेतील वृक्षांच्या संवर्धनावर त्यांचा अधिक भर असून शहरातील इतर ठिकाणी असलेल्या वृक्षांच्या संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी व उपवनसंरक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.