पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:20 PM2017-11-03T23:20:00+5:302017-11-03T23:20:20+5:30
दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन ढासळत आहे. अवैध वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी होते. मानवाच्या आरोग्यासाठी आल्हाददायक नैसर्गिक वातावरण फार निकडीचे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन ढासळत आहे. अवैध वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी होते. मानवाच्या आरोग्यासाठी आल्हाददायक नैसर्गिक वातावरण फार निकडीचे झाले आहे. वातावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी गावाशेजारील जंगल कायम ठेवण्यासह वृक्ष संवर्धनासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया झरपडा येथील मिश्र रोपवनाला भेट देवून पाहणी करताना ग्रामस्थांशी हितगुज साधताना ते बोलत होते.
अर्जुनी-मोरगाव वनविभागाच्या वतीने २०१७ मध्ये झरपडा येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने १५ हे.आर. क्षेत्रामध्ये मिश्र रोपवनाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये जुलै महिन्यात विविध प्रजातींच्या लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली होती. अल्पावधीतच रोपट्यांची वाढ झालेली दिसत आहे. निसर्गरम्य वातावरण निर्मितीचा देखावा असलेल्या मिश्र रोपवनाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देवून रोपवनाची पाहणी केली.
यावेळी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, कंत्राटदार तथा खरेदी विक्री समितीचे संचालक विनोद नाकाडे, अर्जुनी नगर पंचायतचे उपाध्यक्ष विजय कापगते, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, झरपडाचे नवनिर्वाचित सरपंच कुंदा डोंगरवार, वनसमितीचे अध्यक्ष मुन्नालाल बोरकर, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी वनविभागाचे क्षेत्र सहायक एच.टी. खडसे, बरडे, पी.के. ब्राम्हणकर, जे.जी. नागपुरे, बी.एच. सुलाखे, एस.एन. पंधरे यांनी रोपवनाची माहिती पालकमंत्र्यांना दिली.
रोपवनातील वृक्षांची झालेली वाढ पाहून ना. बडोले यांनी समाधान व्यक्त केला. तसेच वृक्ष संवर्धनासाठी जनतेने स्वयंप्रेरणेने पुढे यावे, असे आवाहन केले.