पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षलागवड काळाजी गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:03 PM2019-07-08T22:03:57+5:302019-07-08T22:04:09+5:30
मागील बऱ्याच वर्षांपासून नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग व वातावरणातील बदल अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जलसंकटाची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील बऱ्याच वर्षांपासून नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग व वातावरणातील बदल अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जलसंकटाची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे. यावर मात करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
येथील पवार बोर्डिंग गोंदिया येथे रविवारी (दि.७) आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक तथा वनसंरक्षक रामानुजन, उपवनसंरक्षक एस.युवराज, वनविकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक दिव्या भारती, प्रामुख्याने उपस्थित होते.
फुके म्हणाले, दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. कारण मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. त्यामुळे वृक्षलागवड करु न त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. यासाठी स्वयंस्फुर्तीने नागरिकांनी वृक्षलागवड करावी. वृक्षलागवड ही लोकचळवळ होण्याकरीता लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. वृक्षलागवड करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे या वृक्षलागवड उपक्रमास सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे असे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी, येणाºया नवीन पिढीसाठी एक चांगला संदेश जावा यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करावे. आपण कोणकोणत्या प्रजातीच रोपट्यांची लागवड करतो यावर सुद्धा पर्यावरणाचे संतुलन अवलंबून असते.आप्तस्वकीयांच्या वाढदिवसाला भेट म्हणून एखादी महागडी वस्तू न देता, रोपटे भेट म्हणून दयावे असे त्यांनी सांगितले. अशोक इंगळे यांनी, ‘३३ कोटी वृक्ष लागवड’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. गोंदिया नगरपरिषदेद्वारे सुद्धा वृक्ष लागवडीचा चांगला कार्यक्रम राबवून या वृक्ष लागवडीच्या उपक्रमास सहकार्य करण्यात येईल. यासाठी नागरिकांनी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा व पाणी वाचवा’ हा उपक्रम राबवावा.या वृक्ष लागवड उपक्रमास सर्वांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे सांगीतले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी मांडले. संचालन सहायक वनसंरक्षक एम.एच.शेंडे यांनी केले तर आभार सहायक वनसंरक्षक शेख यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, नगरसेवक दिपक बोबडे, बी.बी.अग्रवाल, मैथुला बिसेन, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यासह वनरक्षक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.