७५ किलोमीटरच्या रस्त्यांवर मिळणार वृक्षछाया
By admin | Published: September 21, 2016 12:25 AM2016-09-21T00:25:33+5:302016-09-21T00:25:33+5:30
जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्याची देण मिळाली आहे. त्यात आता आणखी भर पडत आहे ती रस्त्याच्या दुतर्फा लागत असलेल्या वृक्षांची.
रोहयोतून लागवड प्रगतीपथावर : सद्यस्थितीत ४७२ कामांवर मजुरांची उपस्थिती
मनोज ताजने गोंदिया
जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्याची देण मिळाली आहे. त्यात आता आणखी भर पडत आहे ती रस्त्याच्या दुतर्फा लागत असलेल्या वृक्षांची. त्यामुळे प्रवासादरम्यान उन्हाळ्यात रूक्ष वाटणारे रस्ते आता आल्हाददायक वातावरणासह शितल छाया देतील. त्यासाठी यावर्षी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून ७५.५ किलोमीटरच्या रस्त्यांवर ७५ हजार ५०० रोपटे लावले जात आहेत.
राज्यात २ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दीष्टानुसार यावर्षी १ जुलै रोजी विविध यंत्रणांकडून जिल्ह्यात १० लाखांपेक्षा जास्त झाडे लावण्यात आली. यासोबतच रहदारीच्या रस्त्यालगत झाडे लावण्याचे आव्हानात्मक काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय कोणत्या मार्गावर किती वृक्षलागवड करायची याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले. त्यात सर्वाधिक रस्ते तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निवडण्यात आले आहेत. मात्र सालेकसा तालुक्यात या उपक्रमांतर्गत एकाही रस्त्याची निवड करण्यात आलेली नाही. आतापर्यंत ७५ हजार ५०० पैकी ५१ हजार ५०० रोपट्यांची लागवड पूर्ण झाली आहे. उर्वरित वृक्षलागवड लवकरच पूर्ण केली जाणार आहे.
सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे झाडांना पुरेसे पाणी मिळून ती झपाट्याने वाढत आहेत. मात्र पुढील काळात त्या झाडांना जगविण्याचे आव्हान कायम राहणार आहे. त्यासाठी नियोजन केले जात आहे. ही सर्व झाडे जगल्यास काही वर्षातच रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या झाडांच्या शितल छायेतून मार्गक्रमण करणाऱ्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.