नक्षल बीमोडासाठी ‘ट्राय जंक्शन’
By admin | Published: February 14, 2017 12:54 AM2017-02-14T00:54:15+5:302017-02-14T00:54:15+5:30
महाराष्ट्रातील गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यात नक्षल हालचाली मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
तीन राज्ये एकत्र येणार : पोलीस महासंचालकांनी केली पाहणी
नरेश रहिले गोंदिया
महाराष्ट्रातील गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यात नक्षल हालचाली मोठ्या प्रमाणात दिसून येतात. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील सशस्त्र दूरक्षेत्र मुरकूटडोह कॅम्प पिपरीया, मध्यप्रदेशचा कट्टीपार तर छत्तीसगडचा कटेमा हा परिसर सध्याच्या स्थितीत नक्षलवाद्यांच्या घातक कारवाईसाठी यशस्वी ठरु नये. यासाठी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्यप्रदेश ही तीनही राज्ये एकत्र येऊन ‘ट्राय जंक्शन’ (तिन्ही राज्याच्या सीमांचा त्रिकोण) ही संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्हा नक्षलवाद्यांचा रेस्ट झोन म्हणून ओळखला जात असला तरी जिल्ह्यात नक्षली कारवाया होतच असतात. नक्षलवाद्यांचा पाठलाग गोंदिया पोलिसांनी केला तर ते मध्यप्रदेश किंवा छत्तीसगडच्या सिमेत निघून जातात. जिल्ह्याच्या पिपरिया एओपी ते मध्यप्रदेश राज्यातील कट्टीपार हा परिसर ६० ते ७० किलोमीटरचा आहे. तसेच पिपरिया ते छत्तीसगड राज्यातील कटेमा हा परिसर ८० ते ९० किलोमीटरच्या घरात असल्याने या परिसरात असलेल्या घनदाट जंगलाचा फायदा नक्षलवाद्यांना मिळतो. त्यामुळे या जंगल परिसरात असलेल्या पहाडीत कोणत्याही राज्याचे पोलीस पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करु शकत नाही. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी यात तिन्ही राज्यांच्या सीमांचा त्रिकोण तयार करुन ‘ट्राय जंक्शन’ करण्याचा प्रयत्न असल्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ७ फेबु्रवारी रोजी जिल्ह्याच्या पिपरिया एओपीला भेट दिली. या भेटीत त्यांनी आढावा घेऊन एओपीचे उद्घाटनही केले. त्यांच्यासोबत अप्पर महासंचालक विशेष कृती महाराष्ट्र मुंबईचे विपीन बिहारी, गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, गोंदियाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते. डावी कडवी विचारसरणी (एलडब्ल्यूई) या योजने अंतर्गत दोन कोटी रुपयांतून सुसज्ज करण्यात आलेल्या पिपरिया एओपीचे उद्घाटन करण्यात आले.
७० आदिवासी मुला-मुलींना प्रशिक्षण
पिपरिया एओपी अंतर्गत येणाऱ्या ७० मुला-मुलींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा मिळवून दिला. जनजागरण मेळाव्यात मुला-मुलींना स्पोटर््स शूज वाटप करण्यात आले. आदिवासी भागातील मुला-मुलींचे उत्थान करण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्यामुळे या ७० पैकी एक मुलगा व एक मुलीने पोलीस महासंचालकाच्या समोर केलेल्या वक्तृत्वामुळे इतरांवर बरीच छाप पाडली. ते पोलीस कर्मचारी नाही तर पोलीस अधिकारी होणार असे उद्गार पोलीस महासंचालकांनी त्या विद्यार्थ्यांसंदर्भात काढले.
चौघांना १० हजारांचा पुरस्कार
पोलीस विभागात कार्यरत कर्मचारी नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी जंगलात कारवाई करीत असतात. चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी पोलीस विभागाने चार अधिकाऱ्यांचा सत्कार केला. त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये पारितोषीक पोलीस महासंचालक माथूर यांच्या हस्ते देण्यात आले. त्यात पोलीस उपनिरीक्षक घिवारे, ठाकरे, एसआरपीचे शिंदे व नक्षल आॅपरेशनचे गोस्वामी यांचा समावेश आहे.
नक्षलग्रस्त भागात १७ टॉवर लावणार
पोलिसांचा एकमेकांना सहजरित्या संपर्क व्हावा यासाठी जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात १७ टॉवर लावण्यात येणार आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी बीएसएनल कडून १७ टॉवर मंजूर करवून घेतले आहेत. हे टॉवर लागल्यानंतर पोलिसांना आपसांत संपर्क साधण्यात त्रास होणार नाही. त्याचा फायदा विभागातील कार्यप्रणालीवरही पडणार.