आदिवासी विकास महामंडळ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:26 AM2021-04-14T04:26:27+5:302021-04-14T04:26:27+5:30

देवरी : भंडारा आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयात कार्यरत प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक अशोक राठोड यांच्याकडून सतत अधिनस्थ कर्मचाऱ्यांवर होत ...

Tribal Development Corporation employees stop writing () | आदिवासी विकास महामंडळ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन ()

आदिवासी विकास महामंडळ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन ()

Next

देवरी : भंडारा आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयात कार्यरत प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक अशोक राठोड यांच्याकडून सतत अधिनस्थ कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या नाहक त्रासाबद्दल एक आठवड्यापूर्वी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष ॲड. के. सी. पाडवी व व्यवस्थापकीय संचालक नाशिक यांना निवेदन देणयात आले. मात्र यानंतरही त्यांच्यावर काहीच कारवाई न करण्यात आल्याने महामंडळात कार्यरत भंडारा, नवेगावबांध व देवरी येथील कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. १२) लेखणी बंद आंदोलन केले. तसेच राठोडवर निलंबन किंवा सेवामुक्तीची कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देवरीचे तहसीलदार व ठाणेदारांना देण्यात आले.

मात्र निवेदन देऊनसुद्धा अशोक राठोड यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. सदर अधिकारी आम्हा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नकोसा झालेला आहे. तरी सदर अधिकारी यांच्यावर निलंबनाची किंवा सेवामुक्तीची कारवाई तत्काळ करावी, या मागणीला धरून आदिवासी विकास महामंडळ कार्यालय भंडारा, नवेगावबांध व देवरी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या केंद्रीय संघटनेच्या नेतृत्वात सोमवार (दि. १२) रोजी लेखणी बंद आंदोलन करून अशोक राठोड यांच्या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करून व्यवस्थापकीय संचालक देवरीचे तहसीलदार व देवरीचे ठाणेदार यांना निवेदनाद्वारे माहिती दिली.

निवेदनात राठोड अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्रास देतात. त्यात सध्या तक्रार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना द्वेष भावनेतून त्रास देणे, काही कर्मचाऱ्यांना बदलीचे पत्र देणे व सूडभावनेतून विनाकारण नोटीस देणे असे षडयंत्र रचून कारवाई करीत आहेत. त्याचप्रमाणे रोजंदारीवर ६-७ वर्षांपासून कार्यालयात प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या संगणक सहायकांना कामावर येऊ नका, अशा तोंडी सूचना देऊन त्यांना कार्यालयातून हाकलून लावले आहे. त्यांच्या अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून अपमानित करण्याच्या कृत्यापायी सर्व कर्मचारी धास्तावले आहेत. काही कर्मचारी मानसिक त्रासापायी आजारी पडले असून सध्या ते रजेवर आहेत. या सोबतच कर्मचाऱ्यांवर दबाव आणून त्यांच्याविरोधात केलेली तक्रार मागे घ्या म्हणून कर्मचाऱ्यांकडून केलेल्या तक्रारीबाबत उलटसुलट लिहून घेणे, असे कार्य सध्या भंडारा येथील प्रादेशिक कार्यालयात सुरू आहे.

अशा या कृत्यांतून राठोड हे आपल्या पदाची प्रतिमा धुळीस मिळवित आहेत. यामुळे त्यांच्यावर तत्काळ आदिवासी विकास महामंडळ अधिनियमानुसार कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, संघटनेचे सचिव सुनील भगत, केंद्रीय सल्लागार एस. के. बोरकर, कर्मचारी प्रतिनिधी अमोल धुर्वे यांच्यासह भंडारा, नवेगावबांध व देवरी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वाक्षरीने हे निवेदन दिले आहे.

Web Title: Tribal Development Corporation employees stop writing ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.