आदिवासींची पाऊले कचारगडकडे

By Admin | Published: February 21, 2016 12:55 AM2016-02-21T00:55:13+5:302016-02-21T00:55:13+5:30

देशभरातील आदिवासी समाजबांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे शनिवारपासून (ता.२०) कचारगड यात्रेला सुरुवात झाली.

The tribal steps towards Kachargad | आदिवासींची पाऊले कचारगडकडे

आदिवासींची पाऊले कचारगडकडे

googlenewsNext

यात्रेला सुरूवात : ‘जय सेवा’चा गजर करीत देशभरातील भाविक होताहेत दाखल
विजय मानकर सालेकसा
देशभरातील आदिवासी समाजबांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे शनिवारपासून (ता.२०) कचारगड यात्रेला सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी लोकांची येथे रीघ लागली आहे. दूर-दूरदुरून येणारे भाविक रेल्वे, बस तसेच स्वत:च्या चार चाकी वाहनांनी धनेगाव येथे दाखल होत आहेत. ‘जय सेवा’च्या गजराने धनेगाव ते कचारगड गुफेपर्यंतचा परिसर भक्तीभावाने न्हाऊन निघत आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान धनेगाव येथील विशाल प्रांगणावर आदिवासी समाजाचे प्रतिबिंब दाखविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात गोंडी धर्मसभा महासंमेलन, प्रवचन, मार्गदर्शन, तसेच विविध राज्यातील आदिवासी नृत्य प्रस्तुत केले जाणार आहेत. त्याप्रमाणे गोंडी संस्कृतीचे प्रतीक म्हणून विविध ठिकाणी प्रदर्शन लावण्यात आले आहेत. त्यात गोंड राजाचे शासनकालीन अनेक शस्त्र, वस्त्र, वेशभूषा, बाण, लेखन साहित्य इत्यादीचा समावेश आहे.
बाहेरुन येणारे भाविक कुतूहलाने व श्रद्धेने आधी कचारगड गुफेकडे जाऊन माता जंगो, शंमूसेक तसेच माँ काली कंकालीचे दर्शन करुन पूजा करतात व आपल्या पूर्वजाचे पतीक असलेल्या गुफा स्थळात असलेल्या देवस्थानासमोर नैसर्गिक पूजन विधीतून नवस फेडण्याचे काम करीत असतात. गुफेतून परत आल्यावर खाली धनेगाव येथे मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी विश्रांती घेताना दिसत आहेत. तसेच मुख्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागीसुद्धा होताना दिसून येत आहेत.
एस.टी. महामंडळाच्या बसमार्फत गोंदिया आगारातून गोंदिया ते कचारगड, सालेकसा ते कचारगड, गोंदिया-दर्रेकसा, डोंगरगड अशा एकूण १४-१५ फेऱ्या केल्या जाणार असल्याची माहिती गोंदियाचे आगार प्रमुख गौतम शेंडे यांनी लोकमतला दिली.

आज ध्वजारोहण, आदिवासी विकास व पालकमंत्र्यांची उपस्थिती
रविवारी सकाळी १० वाजता गोंड राजे वासुदेव शाह टेकाम यांच्या हस्ते गोंडी धर्म ध्वज फडविण्यात येणार आहे. स्थानिक आमदार संजय पुराम गोंडवाना राजाचे ध्वजारोहण करतील. त्यानंतर आदिवासींचे प्रेरणास्त्रोत गोंडी धर्माचार्य मोतीरावन कंगाली यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता गोंडवाना महासंमेलन सुरु होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार करणार असून अध्यक्षस्थानी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, पालकमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव, खासदार अशोक नेते, खा. विक्रम उसेंडी, खा.गणेश घोडाम (आदिलाबाद), आमदार राजू तोडसाम (यवतमाळ), आमदार वेदराव होळी (गडचिरोली), पालक सचिव पी.एस. मीना आदींसह गोंडी धर्माचार्य उपस्थित राहणार आहेत.

प्रशासनाने केल्या सोयी
या यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुका प्रशासन समन्वय साधून आवश्यक त्या सर्व सोयी पुरविण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी सालेकसा यांच्या मार्गदर्शनात आणि प्राथमिक आरोग्य केंद्र दरर्केसाच्यावतीने ठिकठिकाणी प्राथमिक उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थासुद्धा आपल्याकडून नि:शुल्क औषधोपचार देण्यासाठी सज्ज आहेत.
भाविकांच्या विविध मदतीसाठी कचारगड समितीचे दूत नेमण्यात आले असून ते धनेगाव ते कचारगडपर्यंत तैनात आहेत. तसेच पोलिस प्रशासनाच्यावतीने ठिकठिकाणी पुरेशी व्यवस्थासुद्धा लावण्यात आलेली आहे.

Web Title: The tribal steps towards Kachargad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.