आदिवासी बनले पोलिसांसाठी ‘लायजनिंग पर्सन’ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:56 AM2021-03-04T04:56:10+5:302021-03-04T04:56:10+5:30
नरेश रहिले लोकमत विशेष गोंदिया : महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर न्यू बेस कॅम्प, मुरकुटडोह ...
नरेश रहिले
लोकमत विशेष
गोंदिया : महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर न्यू बेस कॅम्प, मुरकुटडोह तयार करण्यात आले. या परिसरात राहणाऱ्या जवळपास तीन हजार लोकांना गोंदिया पोलिसांनी विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. पोलिसांकडून आदिवासींना होत असलेली मदत पाहून आदिवासी जनता हे पोलिसांसाठी लायजनिंग पर्सन म्हणून काम करीत आहेत.
जिल्हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील आहे. या जिल्ह्यात ११४ गावे नक्षग्रस्त आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या न्यू बेस कॅम्प, मुरकुटडोह येथे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. आदिवासींच्या उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत देऊन त्यांचा राहणीमान व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. बांबू आधारित कुटीर उद्योगाचे प्रशिक्षण देणे, बांबू कुटीर उद्योगासंदर्भात प्रशिक्षण देण्यास मैत्री फाउण्डेशन नागपूर यांनी उत्सुकता दर्शविली आहे. मुरकुटडोह परिसरात असलेल्या तलावांमध्ये १० किलो मत्स्यबीज तलावात सोडले. धान बीज तसेच जीवाणू संवर्धक व उर्वरक वाटप केले. शेतकऱ्यांना शेतसंदर्भात मार्गदर्शन केले. गाव स्तरावर समित्या स्थापन करून ‘गावाचा विकास, आपला विकास’ या धर्तीवर गावाच्या विकासासाठी मुरकुटडोह क. १, २, ३, दंडारी, टेकाटोला या पाचही गावात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विविध स्वयंसेवी संस्थांचे मदतीने येथे भविष्यात करण्यात येणारी विकासात्मक कामे येथील जनतेस समजावून सांगणे व त्यांचे नियोजन करण्यात आले. प्रथमोपचारासाठी गावातच सोय करून दिली. शेतीचे नवीन तंत्रज्ञान व पद्धती सांगण्यात आल्या. यातून शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उभा करण्याचा प्रयत्न आहे. परिसरातील नाल्यांवर बंधारे बांधून शेती सिंचन करण्यास मदत केली. कंपोस्ट खतनिर्मिती, गांडूळ खतनिर्मिती केली. गाव पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या समित्यांकडून शाश्वत शेती करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी घेतला. आधुनिक पद्धतीने शेती करता यावी तसेच शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे म्हणून कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत एकूण २७० पोती धान बीज वाटप करण्यात आले. भाजीपालावर्गीय पिकांचे बियाणे वाटप केले.
जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अदानी पॉवर प्लॅटच्या मदतीने मुरकुट डोह क. ३ येथे ५०० लीटर प्रतितास क्षमतेचा आरओ प्लॅण्ट बसविण्यात येणार आहे. आरोग्य शिबिर आयोजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची मदत, पाच गावांमध्ये २५० चादर वाटप करण्यात आल्या. जनतेमध्ये पोलिसांप्रति मदतीची व सौहार्दाची भावना निर्माण व्हावी म्हणून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, नोडल ऑफिसर परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ, सालेकसाचे ठाणेदार प्रमोद बघेले, मुरकुटडोह प्रभारी महेश पवार, पोलीस शिपाई विशाल सास्तुरे, गजानंद पोले अशा विविध कर्मचाऱ्यांनी नक्षलग्रस्त भागातील आदिवासींना मदत केल्यामुळे आदिवासी जनता पोलिसांसाठी लायजनिंग पर्सन म्हणून काम करीत आहेत.
बॉक्स
५५ टन वनस्पतीची मागणी
आदिवासींच्या आर्थिक उन्नत्तीसाठी गोंदिया पोलिसांनी नवी मुंबई येथील धुतपापेश्वर आयुर्वेदिक या कंपनीशी चर्चा करून येथील आयुर्वेदिक कच्चा माल विकत घेण्याबाबत चर्चा केली. त्यांनी हा माल घेण्यास संमती दर्शविली आहे. औषधी वनस्पतींची आयुर्वेदिक औषधांसाठीचा कच्चा माल उपलब्ध करून देणे हा उपक्रम सुरू केला आहे. त्या कंपनीचे व्यवस्थापक जगताप यांनी वेगवेगळया अशा आयुर्वेदिक वनस्पतींची ५५ टनांची मागणी नोंदविली आहे. त्याची किंमत अंदाजे चार कोटी रुपयांच्या घरात आहे.
बॉक्स
‘त्या’ गावात झाली शाळा सुरू
मुरकुटडोह परिसरातील सात गावांमध्ये प्राथमिक शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती. येथे प्राथमिक शाळांच्या इमारती असूनही त्या बंद अवस्थेत होत्या. त्या गावातील नागरिकांची बैठक आयोजित करून पोलिसांनी त्या बैठकीला गटशिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी बोलावले होते. मुरकुटडोह क्रमांक १ व २ येथे दोन प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. या परिसरातील सर्व विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षणासाठी पिपरिया, सालेकसा व दरेकसा याठिकाणी जात होते.