शहीद दीपक रहिले यांना श्रद्धांजली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:44+5:302021-01-22T04:26:44+5:30
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कान्होली येथे शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक सखाराम रहिले यांच्या शहीद दिनानिमित्त गुरुवारी त्यांना ...
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कान्होली येथे शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक सखाराम रहिले यांच्या शहीद दिनानिमित्त गुरुवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले हे पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत कर्तव्यावर असताना २० जानेवारी २००३ रोजी नक्षलवाद्यांनी मंगेझरी पुलावर घडवून आणलेल्या स्फोटात शहीद झाले. त्यांची स्मृती व प्रेरणा सतत तेवत राहावी म्हणून, दरवर्षी २० जानेवारीला त्यांचे जन्मगाव कान्होली येथे शहीद दिन पाळला जातो.
या वेळी नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार साहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, धाबेपवनी पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक पानसरे, शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश भेंडारकर, कोदुजी रहिले, ग्रामसेवक बी. डब्ल्यू. झोडे, मुखरण थेर, दीपक रहिले यांची पत्नी पुष्पा व मुलगा सागर रहिले उपस्थित होते.
प्रारंभी शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार महेंद्र रहिले यांनी मानले.