तिरोडा पंचायत समितीचा अजब कारभार उघड
By Admin | Published: September 4, 2015 01:41 AM2015-09-04T01:41:32+5:302015-09-04T01:41:32+5:30
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत सन २००९ मध्ये परसवाडा येथील ताराबाई गोपीचंद शहारे यांना घर मंजूर झाले होते.
परसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत सन २००९ मध्ये परसवाडा येथील ताराबाई गोपीचंद शहारे यांना घर मंजूर झाले होते. पण इंदिरा आवास तयार न करता व पंचायत समितीचे तत्कालीन कनिष्ठ अभियंता लिल्हारे यांनी कसलीही चौकशी न करता साटेलोटे करुन संपुर्ण देयक दिले असल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले.
दि. ३० मार्च २००९ ला १० हजार रुपयांचा चेक अग्रीम देण्यात आला. चेक क्र. ८६७०४८ असून दुसरा धनादेश क्र.५६९१७६ रुपये १५ हजार दि.३/८/२००९ ला देण्यात आला. सदर महिलेने घराचे फाऊंडेशनही खोदले नाही व बांधकाम केलेच नाही. अभियंता व खंडविकास अधिकाऱ्यांनी पैसे दिले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ताराबाई शहारे यांचा घरकुलाचा करारनामा १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर असून दि. २५ मे २००९ ला करण्यात आला. करारनामाच्या आधी चेक क्र. ८६७०४८ नुसार १० हजार दि. ३१ मार्च २००९ ला कसे काय देण्यात आले? त्यावेळी तत्कालीन खंडविकास अधिकारी मसराम होते. नंतर प्रभारी प्रकाश गंगापारी व प्रभारी अरुण गिऱ्हेपुंजे या तीन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने देयक देण्यात आले. सर्व खंडविकास अधिकारी बदलले. गावातील अतुल मेश्राम, राकेश वैद्य यांरी सदर प्रकरण माहितीच्या अधिकारात उघडकीस आणले.
महिला विधवा असून परिस्थिती गरिबीची असल्याने ग्राम पंचायतीने घरकुल मोजनेसाठी नाव पाठविले होते. पण सदर महिलेने घर तयार न करता आपले जुने घर त्याच ठिकाणी ठेवून दुसऱ्याचे घर व शौचालय दाखवून धनादेशाची उचल केली, पण कनिष्ठ अभियंता यांनी देयक दिले कसे उपमोजीता प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून मागीतले जाते, ग्रामसेवकाने ते दिले कसे? यात सर्वांचे हात ओले झाले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सदर प्रकरणाची चौकशी करावी. अशा प्रकारे अनेक गावात काम न करता देयक देण्यात आल्याचे कळते.