नळयोजना ठरली कुचकामी

By admin | Published: July 30, 2015 01:42 AM2015-07-30T01:42:19+5:302015-07-30T01:42:19+5:30

बरबसपुरा येथे सात वर्षानंतर पूर्णत्वास आलेली नळ योजना सुरू होताच कुचकामी ठरली. नळ योजनेचे पाणी नागरिकांना मिळत नाही.

Troubleshooting | नळयोजना ठरली कुचकामी

नळयोजना ठरली कुचकामी

Next

काचेवानी : बरबसपुरा येथे सात वर्षानंतर पूर्णत्वास आलेली नळ योजना सुरू होताच कुचकामी ठरली. नळ योजनेचे पाणी नागरिकांना मिळत नाही. ही योजना कुचकामी ठरण्यामागे तांत्रिक विभागाचे दुर्लक्ष आणि कंत्राटदाराची मनमर्जी असल्याचे सांगण्यात आले.
बरबसपुरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत सन २००६-०७ करिता ४४ लाख रूपये खर्चाची नळ योजना मंजूर करण्यात आली होती. या नळ योजनेचे भूमिपूजन तत्कालीन आ. राजेंद्र जैन व दिलीप बंसोड यांच्या हस्ते करण्यात आले होते. नळ योजनेच्या कामाला सुरूवातीपासून अवकळा लागली होती. प्रारंभी या नळ योजनेचे कंत्राट गोंदियातील कंत्राटदारांना दिले होते. त्यांनी अर्धवट कामे करून ठेवले होते.
काही महिन्यांनी हे काम स्वत:ला कर्तव्यदक्ष समजणारे नागपूरचे राऊत नामक कंत्राटदाराला देण्यात आले. त्यांना तीन ते चार वर्ष काम पूर्ण करण्यासाठी लागले. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१४ मध्ये टाकीत पाणी घालून नळ योजनेतून गावकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गावातील कोणत्याही नागरिकांना नळ योनजेच्या पाण्याची योग्य सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.
बरबसपुरा येथील गावकऱ्यांनी सांगितले की, ज्या दिवसापासून नळाला पाणी सोडण्यात आले, तेव्हा काही निवडक घरांना १० ते १५ गुंड पाणी मिळाले. काही घरी ते चार ते पाच गुंड पाणी तर काही घरी नळाचे पाणीच पोहोचले नाही. नळ योजनेचे पिण्याच्या पाणी सुरू होण्याला सात ते आठ महिने झाले असले तरी निम्म्या गावाला सतत पंधरा दिवस पाणी उपलब्ध झालेले नाही.
सद्यस्थितीत नळ योजना ठप्प पडलेली आहे. काही नागरिकांनी लोकमतला सांगितले, या नळयोजनेतून पिण्याचे पाणी वाटप केले जात आहे. ते पाणी पिण्या योग्यच नाही. काही दिवस गढूळ पाणी नळाव्दारे येते. गावात १८० च्या वर कुटुंबांनी नळ जोडणी घेतली आहे. मात्र नळाचे पाणी निम्म्या लोकांना मिळत नाही, असे सरपंच ममता लिचडे यांनी सांगितले. कंत्राटदारांनी काम पूर्ण केले नसल्याने एम.बी. रोकण्यात आली आहे. एम.बी. करिता कंत्राटदार राजेश राऊत तगादा लावत असले तरी काम पूर्ण केल्याशिवाय एम.बी. देण्यात येणार नाही. नरेंद्र मेश्राम यांच्या घरी नळाला पाणी येत नव्हते. मात्र बाजूला असणाऱ्या अनुसया मोटघरे आणि जावरकर यांच्या घरी नळाला पाणी येत होते.
यासंबधी राजेश राऊत यांना बोलले असता माझे काम झाले, आता तुम्ही पहा. कदाचित भूत लागल्याने बंद पडले असेल, असे उध्दटपणाचे उत्तर कंत्राटदार राजेश राऊत यांची दिल्याचे सरपंच लिचडे यांनी सांगितले. (वार्ताहर)
सर्वांना मलाई, नागरिकांना फुटकी घागर
बरबसपुरा नळयोजनेच्या कामाला सात वर्षापेक्षा जास्त काळ लागला. परंतु त्याचा लाभ ग्रामीण नागरिकांना होत नाही. नळयोनजेच्या कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने निधी उकळण्याकरिता कसे-बसे काम केले. अधिकारी, ग्रामपंचायतने टक्केवारी घेतली. अर्थात सर्वांनी मलाई खाल्ली. योजनेचा लाभ नागरिकांना मिळणे गरजेचे होते, ते मिळाले नाही. नळ योनजेच्या कामाकडे ग्रामपंचायतने जातीने लक्ष दिले नाही. राऊत कंत्राटदाराने सद्बुध्दीने काम केले नाही. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेतले नाही. त्यामुळे ही नळयोजना कुचकामी ठरल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत. नळयोजनेच्या कामाची मलाई कंत्राटदारासह अधिकारी-पदाधिकाऱ्यांना मिळाली. परंतु सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांना काय मिळाले? हे समजण्यासारखे आहे.

Web Title: Troubleshooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.