शेतकरी व बेरोजगारांच्या फसवणुकीचा प्रयत्न
By admin | Published: February 8, 2017 01:12 AM2017-02-08T01:12:59+5:302017-02-08T01:12:59+5:30
पतंजलीने कोणाशीही कोणताच करार केला नाही; मात्र काही भामटे आमचा पतंजली व रामदेवबाबा यांच्याशी करार झाल्याचे सांगून
तिरोडा : पतंजलीने कोणाशीही कोणताच करार केला नाही; मात्र काही भामटे आमचा पतंजली व रामदेवबाबा यांच्याशी करार झाल्याचे सांगून शेतकरी व बेरोजगारांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा फसव्या लोकांपासून व प्रचारापासून सावध राहा, असे आवाहन पतंजली किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी दादासाहेब फुंडे यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पतंजली किसान सेवा समितीची बैठक पार पडली. त्यात जवळपास ४० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.फुंडे पुढे म्हणाले, पतंजली योगपीठ हरिद्वारद्वारे नागपूर जिल्ह्यातील मिहान येथे पतंजली मेगा फूड पार्क प्रकल्प उभारला जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात औषधीयुक्त व जैविक उत्पादनांची मागणी वाढणार आहे. सुशिक्षित, अशिक्षित, बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच संधीचा लाभ काही संधीसाधूंनी उचलण्याचा सपाटा ग्रामीण भागात सुरू केला आहे. स्वदेशीच्या नावावर स्थापित अनेक संस्थांच्या नावांचा उपयोग करीत पतंजली व रामदेवबाबा यांच्याशी करार झाला, आमच्याद्वारेच ते शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार व बेरोजगारांना रोजगार देणार अशी बतावणी करून शेतकरी व बेरोजगार यांची दिशाभूल केली जात आहे. हे भामटे शेतकऱ्यांची शेतजमीन एकरी ५० हजार रूपयेप्रमाणे वर्षाच्या करारपट्टीवर घेण्याचे आमिष दाखवितात. त्यासाठी नोंदणी शुल्क सहा हजार रूपये तर बेरोजगारांना या प्रकल्पात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार रूपये प्रक्रिया शुल्क वसूल करून बायोडाटा स्वीकारत असल्याचे उघडकीस येत आहे. अशा फसव्या लोकांपासून सावध रहा, असे आवाहन करीत ते म्हणाले, पतंजलीच्या कार्यपद्धतीनुसार मिहान येथील फूडपार्कला लागणारा शेतमाल पतंजली थेट शेतकऱ्यांजवळून विकत घेणार आहे. त्यात कोणताही दलाल मध्ये राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी नागेश गौतम, लक्ष्मी आंबेडारे, पंकज रहांगडाले आदी उपस्थित होते.