कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लागतोय कस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 05:00 AM2021-12-17T05:00:00+5:302021-12-17T05:00:26+5:30
ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद ४३, पंचायत समिती ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने १९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला घेऊन सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका लांबल्याने अनेक उमेदवारांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. बुधवारी (दि.१५) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी गुरुवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू केली. प्रचारासाठी आता केवळ तीनच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचताना नेत्यांसह उमेदवारांचासुद्धा कस लागत आहे.
ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद ४३, पंचायत समिती ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने १९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती; मात्र याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
त्यामुळे निवडणूक आयोगाने या निवडणुका ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर बुधवारी (दि.१५) सर्वोच्य न्यायालयाने सुनावणी करीत ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ओबीसी जागा वगळूनच आता निवडणूक होणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे; पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे क्षेत्र मोठे असल्याने केवळ तीन दिवसांच्या कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांसह नेत्यांचासुद्धा कस लागत आहे.
दोन दिवस दिग्गजांच्या सभा
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी यावेळी कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. खा. प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे शुक्रवारी उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेसुद्धा प्रचारासाठी जिल्ह्यात येणार आहेत.