क्षय व कुष्ठरुग्णांची शोधमोहीम ९५६ गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:27+5:302021-06-17T04:20:27+5:30

गोंदिया : समाजातील क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यात संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण ...

Tuberculosis and leprosy search operation in 956 villages | क्षय व कुष्ठरुग्णांची शोधमोहीम ९५६ गावात

क्षय व कुष्ठरुग्णांची शोधमोहीम ९५६ गावात

googlenewsNext

गोंदिया : समाजातील क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यात संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान १ जुलै ते ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविला जाणार आहे. जिल्ह्यातील ९५६ गावांमधील १३ लाख ९४ हजार ११४ लोकांच्या भेटी घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व पुरुष स्वयंसेवक गृहभेटी देऊन समाजातील निदान न झालेले क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोधून त्वरित औषधोपचाराखालील आणणार आहेत. नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, समाजात क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, त्याचबरोबर क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णाचा शोध घेऊन त्यांना औषधोपचारावर आणणे, मोहिमेमध्ये प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे, संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी, आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षयरोगाचे निदान करून औषधोपचार केले जाणार आहे. जिल्ह्यात संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान २०२१-२२ ही कार्यवाही आजादी का अमृत महोत्सव’चे औचित्य साधून राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या आपात्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठ व क्षय रुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. समाजातील कुष्ठ व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी १ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये राज्यात सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती सहायक संचालक (कुष्ठरोग) तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रा.ज. पराडकर यांनी दिली. या मोहिमेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.आर.जे. पराडकर सहकार्य करीत आहेत.

...............

क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये अनुदान

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन विना विकृती कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीचा मोफत औषधोपचार दिला जातो. विकृती प्रतिबंध करणे व समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाची संसर्गाची साखळी खंडित करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय आहे. जनजागृतीद्वारे क्षयरोगाचे लक्षणे, तपासणी, उपचार, औषधोपचार व संदर्भसेवा, उपलब्ध सोयीसुविधा दिल्जा जातात. प्रत्येक क्षयरुग्णांना निक्षय पोषण आहार योजनेअंतर्गत महिन्याकाठी ५०० रुपये अनुदान देण्यात येतो. त्याचबरोबर मोफत क्ष-किरण तपासणी, थुंकी तपासणी, एमडीआर/एक्सडीआर रुग्णांची तपासणी इतर सर्व सोयी सुविधा शासकीय व खासगी रुग्णालयात उपलब्ध केल्या जातात.

.......................................

बॉक्स

सर्वेक्षणासाठी १२४१ चमू

जिल्ह्यात क्षयरोग व कुष्ठरुग्ण सर्वेक्षणासाठी आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका इत्यादींची १२४१ चमूची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यवेक्षणासाठी एकूण जिल्ह्यात २४८ पथके स्थापन करण्यात आली आहेत. सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे कार्य सुरू आहे.

Web Title: Tuberculosis and leprosy search operation in 956 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.