क्षयरोग कर्मचाऱ्यांवर पदमुक्तीची टांगती तलवार

By admin | Published: August 14, 2016 02:00 AM2016-08-14T02:00:42+5:302016-08-14T02:00:42+5:30

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात जवळपास दोन हजार कर्मचारी-अधिकारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत.

Tulsi sword on TB employees | क्षयरोग कर्मचाऱ्यांवर पदमुक्तीची टांगती तलवार

क्षयरोग कर्मचाऱ्यांवर पदमुक्तीची टांगती तलवार

Next

आरोग्य सहसंचालकांचे आदेश :
दोन हजार कर्मचारी-अधिकारी संकटात
गोंदिया : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात जवळपास दोन हजार कर्मचारी-अधिकारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा दुसरा टप्पा ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येत असून पुढे अभियान सुरू राहील किंवा नाही, याबाबत केंद्र शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पदमुक्तीची टांगती तलवार आहे.
क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केला. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी अनेक पदे भरण्यात आली. त्यांना एक दिवसाचा खंड देवून पुन्हा पुनर्नियुक्ती दिली जात होती. अशा अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांची वयोमर्यादा आता ४५ वर्षांपर्यंत पोहोचली आहे. जर त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आली नाही तर त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमित सेवेत घेण्याचे प्रस्ताव मंत्रालयात पडून आहेत. शासन सेवेत नियमित होण्याचे स्वप्न बघत असतानाच शासनाने त्यांच्यावर पदमुक्तीची टांगती तलवार उभी ठेवली आहे.
सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे यांच्या पत्रानुसार, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे. तसेच ३१ मार्च २०१७ नंतर पुढे अभियान सुरू राहील किंवा नाही, याबाबत केंद्र शासनाच्या अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, असे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईचे सहसंचालक (तांत्रिक) यांनी सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे यांच्या कार्यालयास ११ आॅगस्ट २०१६ रोजी पत्रान्वये कळविले आहे. सदर परिपत्रकानुसार, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती किंवा पुनर्नियुक्तीचा कालावधी ३१ मार्च २०१७ नंतर संपुष्टात येणार आहे त्यांंच्या आदेशांबाबत शुद्धीपत्रक काढून किंवा सुधारित आदेश निर्गमित करून ३१ मार्च २०१७ पर्यंतचेच आदेश त्यांना देण्यात यावे, अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

जिल्हा क्षयरोग केंद्रांतर्गत एकूण १८ कर्मचारी कार्यरत आहेत. यात वरिष्ठ उपचार प्रयोगशाळा पर्यवेक्षक चार पदे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक सात पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दोन पदे, लेखापाल एक पद, डाटा एन्ट्री आॅपरेटर एक पद, टीबीएचव्ही सुपरवायजर एक पद व पीपीएम को-आॅर्डिनेटर एक पद अशी पदे कंत्राटी पद्धतीवर आहेत. त्यात वरिष्ठ उपचार पर्यवेक्षकाचे एक पद आजही रिक्तच आहे. या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये सदर आदेशाप्रति रोष व्याप्त आहे.

 

Web Title: Tulsi sword on TB employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.