शेतीपुरक व्यवसायाकडे वळा!
By admin | Published: February 22, 2017 12:22 AM2017-02-22T00:22:02+5:302017-02-22T00:22:02+5:30
धानपीक उत्पादनाकडे अधिक न वळता दुग्ध व्यवसाय शेळीपालन, कुक्कुटपालन व सेंद्रीय भाजीपाला तयार
राजकुमार बडोले : कृषी व पशुसंवर्धन विभागांचा संयुक्त मेळावा
परसवाडा : धानपीक उत्पादनाकडे अधिक न वळता दुग्ध व्यवसाय शेळीपालन, कुक्कुटपालन व सेंद्रीय भाजीपाला तयार करून जास्त उत्पादन घेऊन उद्योग करा. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, असे मार्गदर्शन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
दवनीवाडा येथे जि.प. कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रदर्शन, कृषी भुषण शेतीनिष्ठ सपत्नीक सत्कार, पशुपक्षी, शेळी, म्हैस, गाय व बैलजोडी मेळावा घेण्यात आला. त्यावेळी उद्घाटकीय भाषणातून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते.
ते पुढे म्हणाले, मुंबई व पुणे यासारख्या मोठ्या शहरात सेंद्रीय भाजीपाल्याची मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांनी गाई, म्हशी, शेळी, कुक्कुटपालन हे केवळ घरापुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा विस्तार करावा. मोठ्या प्रमाणात उद्योग करावे. दुग्धपदार्थ तयार करून मोठ्या बाजारात पाठवावे. त्यासाठी आपण मार्केटिंग व शेतीवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.
अधक्षस्थानी आ. विजय रहांगडाले होते. अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, उपसभापती भक्तवर्ती, सरपंच लीना मस्करे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, डॉ. अनिल गजभिये, डॉ. राजेश वासनिक, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, खंडविकास अधिकारी एस.व्ही. इस्कापे, पशुधन विभाग अधिकारी डॉ.पी.आर. सैयद, पं.स. सदस्य गुड्डू लिल्हारे, निता पटले, निलकंठ लांजेवार, संजू बैस परिसरातील सर्व सरपंच, गावकरी, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. विजय रहांगडाले यांनीही शेतकऱ्यांना दुध व अन्य व्यवसायाकडे वळून उद्योग करण्याचा सल्ला दिला. आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता कमी पडू देणार नाही. २६ जानेवारीला वैनगंगेचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यात आले असल्याचे सांगितले. दवनीवाडा तालुका बनावा यासाठी आपण प्रयत्नशील असून तसा पाठपुरावा पालकमंत्री यांच्याकडे करणार. स्वत: पालकमंत्री कार्यक्रमात असल्याने व्यासपीठावरून सर्व जाणीव आ. विजय रहांगडाले यांनी पालकमंत्री यांना करुन दिली. रस्ते, शाळा व जलशिवारयुक्त अंतर्गत कामे करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
सामाजिक कार्यकर्ते निलकंठ लांजेवार यांनीही तालुक्याची मागणी केली. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, डॉ. राजेश वासनिक, डॉ. गजभिये, सभापती छाया दसरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. राजेश वासनिक यांनी मांडले. संचालन डॉ. महेश राठोड यांनी केले. आभार कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी पं.स. सदस्य गुड्डू लिल्हारे, राजेश उरकुडे, सलीमभाई, लक्ष्मण मिश्रा, गंगासागर मंडेले, आत्माराम दसरे, माया जतपेले तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)