रेल्वे स्थानकावरील मेटल डिटेक्टर यंत्रणा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 08:54 PM2018-05-08T20:54:00+5:302018-05-08T20:54:00+5:30
मुंबई-हावडा मार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेवर रेल्वे गाड्या धावतात. तर हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. विविध सुविधांमुळे या रेल्वे स्थानकाला चांगल्या रेल्वेस्थानकाचा दर्जा मिळाला असला तरी सुरक्षाविषयक उपाय योजनेत हे पूर्णपणे फेल ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुंबई-हावडा मार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेवर रेल्वे गाड्या धावतात. तर हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. विविध सुविधांमुळे या रेल्वे स्थानकाला चांगल्या रेल्वेस्थानकाचा दर्जा मिळाला असला तरी सुरक्षाविषयक उपाय योजनेत हे पूर्णपणे फेल ठरले. रेल्वे स्थानकावरील मेटल डिटेक्टर यंत्रणा मागील सहा महिन्यापासून बंद पडली असून अद्यापही ती पूर्ववत न केल्याने रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाºयावर आहे.
दिवसेंदिवस गोंदिया रेल्वे स्थानकाच्या विकासात भर पडत आहे. मागील वर्षी येथे मेटल डिटेक्टर मशीन लावण्यात आली. मात्र सद्यस्थितीत ही मेटल डिटेक्टर मशीन बंद असल्याने रेल्वे स्थानकात ये-जा करणारे सर्रासपणे आपल्या सामानांसह रेल्वे स्थानकाच्या आत व बाहेर प्रवेश करतात. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसर किंवा रेल्वेगाड्यांमध्ये कधीही घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्टÑाच्या टोकावर गोंदिया जिल्हा असून येथे जंक्शन रेल्वे स्थानक आहे. नागपूर, रायपूर, जबलपूर व चंद्रपूर अशा चारही दिशांनी येथून दररोज दीडशेच्यावर रेल्वेगाड्या धावतात. हजारो-लाखो टन माल वाहतूक (वस्तू) रेल्वेद्वारे केली जाते. विशेष म्हणजे सर्वाधिक मालवाहतुकीतून उत्पन मिळवून देणारे रेल्वे स्थानक म्हणून या स्थानकाची ओळख आहे. मात्र रेल्वेतून जो माल पार्सल केला जातो. त्या पार्सलला सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन किंवा तपासण्याची कोणतीही व्यवस्था सध्यास्थितीत गोंदिया रेल्वे स्थानकावर उपलब्ध नाही. कधी कधी तर पार्सल कार्यालयातूनच प्रवाशांची ये-जा सुरू असते. पार्सल केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅनर लावण्याची जबाबदारी वाणिज्य विभागाची आहे. पार्सलला सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन व तपासणीसाठी नियम व कायदा प्रस्तावित आहे. पार्सलसाठी काही गाड्यांना कंत्राटीतत्वावर दिल्या जातात. लाखो टन माल कोणतीही तपासणी व स्कॅन न करता अनेक रेल्वेगाड्यांतून ने-आण करतात.
दुसरीकडे गोंदिया रेल्वे स्थानकाचे बाजार परिसराकडील प्रवेशद्वार व होमप्लॅटफार्म यांच्या मधात मेटल डिटेक्टर मशीन मागील वर्षी लावण्यात आली होती. काही दिवसांपर्यंत ही सेवा सुरळीत सुरू होती. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी या मेटल डिटेक्टर मशीनमधून जावे लागत होते. प्रवाशांना त्यांच्या वस्तू स्कॅनर मशीनमध्ये टाकाव्या लागत होत्या. मात्र अल्पावधीतच मेटल डिटेक्टर मशीन बंद पडली. त्यामुळे कोणताही व्यक्ती सामान घेवून थेट रेल्वे स्थानकात प्रवेश करतो. रेल्वे सुरक्षिततेच्या त्रुटीचा फायदा घेवून कोणताही स्फोटक पदार्थ पार्सल करून असामाजिक तत्वांनी हल्ला चढविला तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.