बारावीच्या निकालाच्या सूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:01+5:302021-07-20T04:21:01+5:30
गोंदिया : तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहे. दहावीच्या निकालाप्रमाणेच बारावीच्या ...
गोंदिया : तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहे. दहावीच्या निकालाप्रमाणेच बारावीच्या निकालासाठीही मागील वर्गाची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. दहावीत मिळालेल्या गुणांना ३०, अकरावीत मिळालेल्या गुणांना ३० टक्के आणि बारावीतील कामगिरीसाठी ४० टक्के गुण दिले जाणार आहेत. एकंदरीत बारावीचा निकाल याच फाॅर्म्युल्यानुसार जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीत काही कारणास्तव अनेकांना कमी गुण मिळाले. अकरावीत रेस्ट इअर मानले जाते. त्यामुळेच या फाॅर्म्युल्यामुळे बारावीच्या निकालाला घेऊन विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने ५ ऑगस्टपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बारावीच्या निकालाचा फाॅर्म्युला लक्षात घेता निकाल काय लागतो या धर्तीवर विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
.....................
३० टक्क्यांचे सूत्र गणित बिघडविणार!
दहावी आणि अकरावीचे गुण पकडून तुम्ही नक्कीच पास होणार अशी खात्री शिक्षकांना दिली आहे. मात्र, यामुळे थोडी चिंता वाढली आहे. ज्यांनी वर्षभर अभ्यास केला नाही त्यांची मात्र या निकालाच्या सूत्राने मजा झाली आहे. पास होणार हे माहिती आहे. मात्र, या निकालाने फारसा आनंद किवा समाधान वाटत नाही.
- प्रवीण रामटेके, विद्यार्थी.
.......
शिक्षकांनी प्रात्याक्षिक परीक्षा घेतली. अंतर्गत मूल्यमापन केले, पण दहावी आणि अकरावीचे गुण विचारात घेतले जाणार आहेत. त्यामुळे निकालाविषयी काळजी आहे. कारण दहावीमध्ये कडक सेंटरवरून परीक्षा दिली. त्यामुळे निकाल काय लागतो याकडे लक्ष आहे.
.................
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस करण्याची गरज
यंदा बारावीच्या निकालाचे सूत्र ठरले आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच अशा पद्धतीने निकाल जाहीर केला जात आहे. दहावी, अकरावी आणि बारावीत त्याच विद्यार्थ्यांचे मूल्याकंन हे वेगवेगळे असू शकते. दहावीत कमी गुण मिळालेले विद्यार्थी बारावीत आवडीची शाखा घेऊन अधिक गुण मिळवू शकतो.
- विजय दुर्गे, प्राध्यापक.
........................
शासनाच्या नियमानुसार बारावीचे मूल्याकंन केले जात आहे. मात्र, काही कारणांमुळे मागील वर्गात कमी गुण असलेल्या हुशार विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालावर परिणाम हाेणार आहे. ही बाब पालकांनी यावेळी विचारात घेण्याची गरज आहे.
- अनिल मंत्री, प्राचार्य सरस्वती महाविद्यालय.
.....
जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी : २०८६५
मुले : १०६२७
मुली : १०२२९
..............