२३ केंद्रावर १५३२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 05:00 AM2022-03-03T05:00:00+5:302022-03-03T05:00:07+5:30
परीक्षेत मुख्य केंद्रासाठी मुख्य केंद्रचालक, उपकेंद्रावरील त्याच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य किंवा वरिष्ठ शिक्षक यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रचालक म्हणून प्राथमिक पदवीधर शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळांचे एकूण २७ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची अतिरिक्त केंद्रचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे निकाल तयार करून परीक्षा मंडळाकडे पाठविले. ज्याच्या आधारे २०२१ चे निकाल जाहीर करण्यात आले. परंतु मार्च २०२२ मध्ये होणारी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहेत. परीक्षेबाबत तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागाने परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे.
परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार, जिथे ज्युनिअर कॉलेज आहे तिथे परीक्षा केंद्राचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयात १५ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, त्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी जवळच्या केंद्र व उपकेंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेंतर्गत सालेकसा ज्युनिअर कॉलेज सालेकसा, जि.प. ज्युनिअर कॉलेज कावराबांध, पंचशील कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला, ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय तिरखेडी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय सोनपुरी, गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय दरेकसा या सहा मुख्य परीक्षा केंद्रांव्यतिरिक्त १७ उप-केंद्रे स्थापन केली आहेत. या सर्व केंद्रांवर ४ मार्चपासून १५३२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यासह यावेळी परीक्षेत मुख्य केंद्रासाठी मुख्य केंद्रचालक, उपकेंद्रावरील त्याच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य किंवा वरिष्ठ शिक्षक यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रचालक म्हणून प्राथमिक पदवीधर शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळांचे एकूण २७ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची अतिरिक्त केंद्रचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
परीक्षा पद्धतीत बदल
- यंदा परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये १०० गुणांच्या पेपर आधी तीन तासाचा होता, तो आता ३.३० तासाचा आहे. ४० गुणांच्या अडीच तासाच्या पेपरसाठी आता ३ तासाची वेळ ठेवण्यात आली आहे. परीक्षार्थींना सकाळी १०.३० च्या पेपरसाठी एक तास आधी म्हणजे ९.३० वाजता हजर राहावे लागेल. कोरोनाचा संसर्ग पाहता मास्क लावणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे तापमान आणि परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर तपासल्यानंतरच केंद्रावर प्रवेश दिला जाईल.
असे मिळणार मानधन...
- अतिरिक्त केंद्रचालकांना किलोमीटरनुसार मानधन देण्यात येणार आहे. शहरी भागात ३ कि.मी.पर्यंत रु. ६००, ३ ते ६ कि.मी.पर्यंत रु. ८००, ८ कि.मी.वर रु. १००० आणि ग्रामीण भागात ५००, ७००, ८०० आणि ९०० रु. मानधन दिले जाईल. बैठ्या पथकाला १०० विद्यार्थ्यांमागे रु. ३००, १०१ ते ६०० विद्यार्थ्यांमागे रु. ४००, ३०१ ते ६०० विद्यार्थ्यांना रु. ५००. आणि ६०० च्या वर रु. ६०० मानधन दिले जाईल.