पर्यटन संकुलाचे वाजले बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:00 AM2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:26+5:30
पर्यटन संकुलाचा विकास व्हावा यासाठी नागपूर, गोंदिया, मुंबई येथे शासन स्तरावर बैठका होऊन हे संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु माशी कुठे शिंकते हे कळायला मार्ग नाही. स्थानिक वनविभाग,वन्यजीव विभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग पर्यटन विकास महामंडळ एवढे विभाग या पर्यटन संकुलाशी निगडीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन संकुलाचा विकास रोजगार निर्मितीच्या उद्देशाने केल्यास हजारो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सध्या हे संकुल वन्यजीव संरक्षण विभागाकडे व्यवस्थापनासाठी दिले आहे.मात्र या विभागाकडून संकुलाच्या विकासासाठी आत्तापर्यंत कुठलेही पाऊले उचलण्यात आले नाही. त्यामुळे पर्यटन संकुलाला वाळवंटाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.जिल्ह्यासाठी वैभव असलेल्या पर्यटन संकुलाच्या योग्य संवर्धनाअभावी बारा वाजले आहे.
पर्यटनातून रोजगाराची निर्मिती हे उद्दिष्ट समोर ठेऊन केंद्र व राज्य शासन कोट्यावधी रुपयांच्या योजना राबवित आहे. त्याच धर्तीवर या पर्यटन संकुलाचा विकास करण्यासाठी स्थानिक वन समितीला व्यवस्थापनासाठी द्यावे, अशी मागणी समितीच्या वतीने शासनाला अनेकदा करण्यात आली. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षीतपणामुळे या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. वनविभाग गोंदियाच्या वतीने चार वर्षापूर्वी वन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा निधी समितीकडे अखर्चित पडून आहे.७ कोटी रुपयाचे मंजूर झालेली कामे अद्यापही सुरु झाले नाही. समितीने जवळपास १०० बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण दिले आहे. हे सर्व प्रशिक्षीत युवक-युवती रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत.
पर्यटन संकुलाचा विकास व्हावा यासाठी नागपूर, गोंदिया, मुंबई येथे शासन स्तरावर बैठका होऊन हे संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
परंतु माशी कुठे शिंकते हे कळायला मार्ग नाही. स्थानिक वनविभाग,वन्यजीव विभाग, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग पर्यटन विकास महामंडळ एवढे विभाग या पर्यटन संकुलाशी निगडीत आहेत. बैठकीत व समितीच्या पदाधिकारी सदस्यांना आत्तापर्यंत अनेकदा आश्वासने देण्यात आली.पण त्याची अद्यापही पुर्तता करण्यात आली नाही.त्यामुळे समितीचे पदाधिकारी व सदस्य संतप्त झाले आहेत.
पर्यटनस्थळांची दुरवस्था
शासनाच्या पर्यटन धोरणानुसार या पर्यटन संकुलात विश्रामगृहे, बालोद्यान, उपहार गृह, हिलटॉप गार्डन, हॉलीडे होम्स गार्डन, तंबू निवास, नौका नयन, संजय कुटी परिसर व विश्राम गृह, नवेगावबांधचा नयनरम्य व निसर्ग सौंदर्याची उधळण करणारे जलाशय, विकासाच्या व पुनर्रजीवनाच्या प्रतिक्षेत असलेले मनोहर उद्यान रॉक गार्डंन आदी पर्यटन स्थळांचा संकुलात समावेश आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने बिकट अवस्था झाली आहे.
बेरोजगारांना रोजगाराची प्रतीक्षा
नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. यासाठी प्रशिक्षण घेतलेले ५० बेरोजगार युवक-युवती रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.वन्यजीव संरक्षण विभाग, वनविभाग व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जर पर्यटन संकुलाच्या विकासाची तळमळ असती तर या संकुलाचा कायापालट होण्यास व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त होण्यास वेळ लागला नसता.