पर्यटन विकासाचे अडीच कोटी पडून
By admin | Published: February 9, 2017 12:59 AM2017-02-09T00:59:09+5:302017-02-09T00:59:09+5:30
जिल्ह्यात अ आणि ब वर्गातील एकही पर्यटनस्थळ नाही. क वर्गातील १३ पर्यटनस्थळे असून सन २०१६-१७ या वर्षात विविध कामे करण्यासाठी
१० महिन्यांत ४६ लाखांची कामे : चार स्थळांवर तुरळक खर्च
नरेश रहिले गोंदिया
जिल्ह्यात अ आणि ब वर्गातील एकही पर्यटनस्थळ नाही. क वर्गातील १३ पर्यटनस्थळे असून सन २०१६-१७ या वर्षात विविध कामे करण्यासाठी शासनाने ३ कोटी ३० लाख ८० हजार रूपये दिले आहेत. परंतु १० महिन्यांच्या काळात चार पर्यटनस्थळांच्या आठ कामांसाठी ७६ लाख ५९ हजारांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु त्यातील फक्त ४६ लाख ४९ हजार २९० रूपये खर्च करण्यात आले आहेत. या वर्षासाठी पर्यटनावर खर्च करण्यासाठी आलेल्या अडीच कोटी निधीचे नियोजनच नसल्याने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिड महिन्यात पर्यटनावर उरलेले अडीच कोटी खर्च होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील १३ पर्यटनस्थळांमध्ये नवेगावबांध, नागरा, नागझिरा, प्रतापगड, ईटीयाडोह, ढासगड, शिरपूर धरण, कचारगड, मांडोदेवी, चूलबंद, बोदलकसा, चोरखमारा व पांगडी जलाशय हे प्रमुख पर्यटनस्थळ आहेत. या स्थळांचा विकास करण्यासाठी सरकारने ३ कोटी ३० लाख ८० हजार रूपये दिले आहेत. यापैकी ४६ लाख १४ हजारांचा निधी वितरीत करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे. चालू वर्षासाठी २ कोटी ८४ लाख रूपयांचा निधी उपलब्ध असल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे.
एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत १० महिन्यात ६० लाखांच्या कामांनाच प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मागच्या वर्षीच्या कामांसाठी १६ लाख ५९ हजार २९० रूपये वितरीत करण्यात आले. चालू वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांवर ३० लाख रूपये वितरीत करण्यात आले. असा एकूण ४६ लाख ५९ हजार २९० रूपयाचा निधी वितरीत करण्यात आला आहे. परंतु १३ पैकी फक्त चारच पर्यटन स्थळांवर तुरळक प्रमाणात खर्च करण्यात आला.
हाजराफॉलकडे अधिक लक्ष
जिल्हा प्रशासनाने सन २०१६-१७ या वर्षात ७६ लाख ५९ हजार रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. या रकमेतून आठ कामे करण्यात येणार असून आठ पैकी चार कामे हाजराफॉल येथे करण्यात येत आहेत. १० लाखातून रस्ता खडीकरण, १० लाखातून संरक्षण भिंत, १० लाख सौंदर्यीकरणासाठी, १० लाख नाली बांधकामासाठी, कचारगडच्या मैदानाच्या सपाटीकरणासाठी १० लाख, सिमेंट रस्त्यासाठी १० लाख, चोरखमारा ते शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ९ लाख ९ लाख ९९ हजार ७३१ रूपये तर बोदलकसा येथील विश्रामगृह रस्त्याच्या सिमेंट बांधकामासाठी ९ लाख ९९ हजार २३४ रूपये मंजूर करण्यात आले. या पर्यटन स्थळांवर तूरळक कामे करण्यात आली, परंतु इतर पर्यटन स्थळांवर कवडीही खर्च करण्यात आली नाही. अडीच कोटी पडून असताना पर्यटनस्थळांचा विकास करण्यास जिल्हा प्रशासन मागे पडत आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेतून ‘केळझरा’चा विकास
वनपर्यटन/इको टुरीझमच्या माध्यमातून शासनाने प्रादेशिक पर्यटन योजनेतून ४ जानेवारी २०१७ रोजी एक कोटी ३६ लाख ६६ हजार रूपये पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने मंजूर केले आहे. या रकमेचा पहिला हप्ता २० लाख रूपये देण्यात आला. ती रक्कम जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ यांना सोपविली आहे. शासनाने मंजूर केलेल्या एक कोटी ३६ लाख ६६ हजार रूपयातून ७० लाख ९७ हजाराचे सभामंडप, २३ लाख १६ हजार रूपयातून प्रवेशद्वार, ३२ लाख ९४ हजारातून शौचालय, ४ लाख ३१ हजारातून सेप्टीक टँक, दोन लाख ८९ हजारातून दोन हातपंप, २ लाख ३९ हजारातून रेन वॉटर हार्वेस्टींग तयार करण्यात येणार आहे.