एकाच महोत्सवाचे दोनदा उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:26 PM2018-02-18T21:26:33+5:302018-02-18T21:26:57+5:30
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ फेब्रुवारी या पाच दिवशीय जिल्हा कृषी व पलास महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, साईनगर येथे करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ फेब्रुवारी या पाच दिवशीय जिल्हा कृषी व पलास महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, साईनगर येथे करण्यात आले आहे. मात्र या महोत्सवाचे सलग दोनदा उद्घाटन झाल्याने या महोत्सवाची चांगलीच चर्चा आहे. तर कृषी विभागाचे ढिसाळ नियोजन आणि जनजागृतीचा अभावाचा या महोत्सवाला फटका बसल्याचे चित्र होते.
कृषी व पलास महोत्सवाचे उदघाटन १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. परंतु पहिल्या दिवशी उदघाटनाला पालकमंत्री न पोहचल्याने पुन्हा रविवारी (दि.१८) पालकमंत्र्यांना बोलावून या महोत्सवाचे दुसऱ्यांदा उद्घाटन करण्यात आले. दरम्यान या प्रकाराने स्टॉलधारकांसह शेतकरी सुध्दा आश्चर्य चकीत झाले. कृषी विभागाच्या नियोजन शुन्यतेमुळे निमंत्रण दिलेल्यांपैकी अनेकांनी या महोत्सवाकडे पाठ दाखविल्याची माहिती आहे.
प्राप्त महोत्सवाचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, मुकाअ राजा दयानिधी उपस्थित होते. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता पुन्हा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुकाअ राजा दयानिधी, जि.प. जि.प. सभापती शैलजा सोनवाने, अ.भा. भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे व प्रगतीशिल शेतकरी उपस्थित होते.
कृषी महोत्सवातून शेतकरीच गायब
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय कृषी व पलास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांसाठी हे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यापर्यंत या महोत्सवाची माहिती पोहचविण्यात कृषी विभागाला अपयश आले. त्यामुळे कृषी महोत्सवात शेतकरी गायब असल्याचे चित्र होते. महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या भव्य डोममधील शेकडो रिकाम्या खुर्च्या बरेच काही सांगून जात होते. तर महोत्सवस्थळी १८० स्टॉल लावण्यात आले असून याकडे नागरिकच भटकत नसल्याने स्टॉल धारकांच्या चेहऱ्यावर देखील त्याचे भाव दिसून येत होते.
पाच दिवसांच्या आयोजनावर १४ लाखांचा खर्च
पाच दिवस चालणाºया या प्रदर्शनीसाठी १४ लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनीत सेंद्रिय तांदळाचे प्रदर्शन व विक्री, गटशेतीबाबत माहिती व मार्गदर्शन, यांत्रिकीकरण व शेतीविषयक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, जलयुक्त शिवार अभियानाबाबत माहिती व मार्गदर्शन, कृषीविषयक अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती, महिला बचतगटांनी उत्पादित केलेले चटपटीत खाद्यपदार्थ, हातकुटीचे तांदूळ, पोहे, घरगुती पापड, मसाले, मत्स्यलोणचे, वळी, शेवया, पळस चहा, आंबाडी शरबत, हस्तकला, प्रदर्शन व विक्री, जातीवंत पशू व पक्षांचे प्रदर्शन आणि आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी १८० स्टॉल लावण्यात आले आहेत. लाखो खर्च करून मोठे शामीयाना उभारण्यात आले आहे.
महोत्सवाला अनेकांची दांडी
कृषी महोत्सवासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून जलपुरूष व द रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह, जल व भू व्यवस्थापन संस्था औरंगाबादचे प्रमुख प्रा. राजेंद्र पुराणिक यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले. मात्र ते महोत्सवाला आलेच नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत निमंत्रण पत्रिका पोहचली की अशी चर्चा महोत्सव परिसरातच होती.