शासकीय योजनांचा दुहेरी लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 08:49 PM2018-05-14T20:49:35+5:302018-05-14T20:49:35+5:30
शासनाच्या योजनेतून गाव विकास कामांना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत मानेगावने कार्यगती अभियान राबविले आहे. या अभियानातंर्गत नियोजित कामांना गती देण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. तर शासनाच्या योजनेमुळे गावाला दुहेरी लाभ मिळत असल्याचे सरपंच सुनंदा उके यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शासनाच्या योजनेतून गाव विकास कामांना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत मानेगावने कार्यगती अभियान राबविले आहे. या अभियानातंर्गत नियोजित कामांना गती देण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. तर शासनाच्या योजनेमुळे गावाला दुहेरी लाभ मिळत असल्याचे सरपंच सुनंदा उके यांनी सांगितले.
सदर अभियानांतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांनी नरेगा अंतर्गत कार्यारंभ असलेल्या कामांवर भोजन अवकाश वेळेत कार्यगती अभियानास सुरुवात केली. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुनंदा उके, उपसरपंच अरुण मानकर, सचिन एस.एस. ब्रह्मवंशी, ग्रामपंचायत सदस्य राजेश भलावी, शिशुकला रहांगडाले, प्रकाश मेश्राम, मालन मेश्राम, केशर गुजर, लता कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष आंबेडारे, पोलीस पाटील संजय पुंडे उपस्थित होते.
कार्यगती अभियानांतर्गत आयोजित उपक्रमात सरपंच सुनंदा उके यांनी, शासनाच्या योजनेतून गावाला दुहेरी लाभ मिळत आहे.
नरेगा अंतर्गत विकासकामात जलसिंचनासाठी तलाव खोलीकरणाला गती मिळाली आहे. तर या जलसिंचनासाठी सुरु असलेल्या कार्यातून गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होत आहेत. असे मत व्यक्त करीत शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या वेळी ग्रामसचिव एस.एस. ब्रह्मवंशी यांनी नरेगा अंतर्गत प्रस्ताव, नियोजनाची माहिती, रोजगार संधी व लाभ याबाबद शासन परिपत्रकाची माहिती दिली. तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
मानेगाव ग्रामपंचायत अंतर्गत कार्यगती अभियानात नरेगा कार्यारंभ कामाची पाहणी खंडविकास अधिकारी एस.एम. पांडे, विस्तार अधिकारी एल.एन. कुटे, के.एम. रहांगडाले यांनी केली. तसेच शासकीय योजना व लाभ याबाबद माहिती देत नागरिकांच्या कार्याची दखल घेतली व जल सिंचनाचे महत्व समजावून सांगण्यात आले.
संचालन व आभार उपसरपंच अरुण मानकर यांनी केले. अभियानाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावकरी यांनी सहकार्य केले.