ठाणेदाराच्या घरमालकाच्या घरून चोरी करणाऱ्या दोघांना अटक
By नरेश रहिले | Published: December 17, 2023 04:39 PM2023-12-17T16:39:20+5:302023-12-17T16:39:40+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: मोबाईल केला हस्तगत.
गोंदिया: आमगावचे ठाणेदार युवराज हांडे यांचे घरमालक पुनम पाऊलझगडे यांच्या घरून पाच सहा महिन्यापूर्वी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १५ डिसेंबर रोजी अटक करून आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. तेजवंतकुमार दिलीपकुमार पाटीला (१९) व विकास महेश खुटेल (२३) दोन्ही रा. मोहारा ता. डोंगरगड जि. राजनांदगाव (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आमगाव तालुक्याच्या किडंगीपार येथील पुनम पाऊलझगडे यांच्या घरून लाखो रूपयाचा माल पाच-सहा महिन्यापूर्वी चोरी केली होते. या संदर्भात आमगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त मािहतीच्या आधारे त्या दोघांना अटक केली आहे. त्या आरोपींजवळ त्या घटनेतील मोबाईल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार नेवालाल भेलावे, चेतन पटले, पोलीस शिपाई संतोष केदार, हंसराज भांडारकर, घनश्याम कुंभलवार यांनी केली आहे.
चोरी केलेली रक्कम नशात उडविली
मागील ५ ते ६ महिण्यापूर्वी रात्रीच्या वेळी किडंगीपार येथील पाऊलझगडे यांच्या घरून चोरी केलेली रक्कम आरोपींनी नशापाण्यात उडविली असल्याची कबुली पोलिसांना दिली. या प्रकरणात मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपास ठाणेदार युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.