गोंदिया जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांना काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 08:41 PM2020-05-18T20:41:52+5:302020-05-18T20:43:51+5:30
गोंदिया जिल्ह्यातील जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वनप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. अशात जंगलातून पाण्याच्या शोधात भटकत आलेली दोन अस्वले विहिरीत पडल्याची घटना तालुक्यातील जांभळी येथे सोमवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यातील जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वनप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. अशात जंगलातून पाण्याच्या शोधात भटकत आलेली दोन अस्वले विहिरीत पडल्याची घटना तालुक्यातील जांभळी येथे सोमवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान वन्यजीवव आणि वनविभागाच्या चमूने चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून विहिरीत पडलेल्या दोन्ही अस्वलांना सुखरुपणे बाहेर काढले.
मागील दोन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने रस्ते मानवरहित झाले आहेत. तसेच रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ सुध्दा कमी झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. आठ दिवसांपूर्वी गोंदिया शहरात एक काळविट आले होते. त्यातच जंगल परिसरातील गावांमध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा शोधात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असल्याचे चित्र आहे. सालेकसा तालुका हा जंगलव्याप्त असल्याने या भागात नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असतो. सोमवारी पहाटेच्या सुमारास जंगलातून पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असलेल्या दोन अस्वल विहिरीत पडल्याची घटना घडली. दरम्यान याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी व वनकर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले. त्या अस्वलांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी एक रेस्क्यू टीम तयार करण्यात आली होती. दोन्ही अस्वलांना चार तासांच्या मोहीमेनंतर बाहेर काढण्यात यश आले. दोन्ही अस्वले वयस्क आहेत. नर-मादा असल्याचे सांगितले जाते. यानंतर त्यांना घनदाट जंगलात सोडण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पशूविकास अधिकारी डॉ.खोडसकर व डॉ. वऱ्हाडपांडे यांचा समावेश आहे. रेस्क्यूची कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी ए.बी.इलमकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.