रेल्वेच्या धडकेत दोन अस्वल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:55 AM2021-03-04T04:55:52+5:302021-03-04T04:55:52+5:30
गोंदिया : हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर गोंदिया जंक्शन ते गंगाझरी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर एका ट्रेनच्या धडकेत दोन अस्वलांचा ...
गोंदिया : हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर गोंदिया जंक्शन ते गंगाझरी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर एका ट्रेनच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना ३ मार्चच्या सकाळी ७ वाजता उघडकीस आली. मृत दोन्ही अस्वलांचे वय ३ वर्ष आहे. याआधी याच रेल्वे मार्गावर एका बिबट्याचादेखील ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला होता.
गंगाझरी रेल्वे स्टेशन जवळ दोन अस्वल रेल्वेसमोर आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती बुधवारी सकाळी गीतांजली रेल्वेचालकाने गोंदिया रेल्वे स्टेशनला दिली. गोंदिया रेल्वे स्टेशनने याची माहिती तत्काळ गोंदिया वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी घेऊन दोन्ही अस्वलांची पाहणी केली असता तर दोन्ही अस्वलांचा मृत्यू झाला होता. रेल्वेच्या धडकेत एका अस्वलाच्या डोक्याला व तोंडाला, तर दुसऱ्या अस्वलाच्या पोटाला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने दर्शविला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही अस्वलांना गंगाझरी येथील क्षेत्र सहायक वनविभाग येथे नेऊन शवविच्छेदन करण्यात आले.
बॉक्स
यापूर्वीही अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू
गोंदिया जंक्शन हे रेल्वे स्टेशन हावडा-मुंबई रूळावर आहे. गोंदियावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील पहिले रेल्वे स्टेशन हे गंगाझरी आहे. या स्टेशनच्या काही अंतरावर नागझिरा अभयारण्याचा परिसर लागून आहे. त्यामुळे अनेकदा वन्यप्राणी इकडे भटकत असतात. रेल्वे मार्गावर येतात. त्यामुळे अनेकदा वन्यप्राणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.