मांडोदेवीच्या जंगलात आढळले दोन मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:48 AM2018-12-16T00:48:30+5:302018-12-16T00:48:59+5:30
तालुक्यातील बघेडा येथील सूर्यादेवी मांडोदेवी परिसरातील हरदोली मार्गावर देवस्थानापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर एका विवाहित महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यातील बघेडा येथील सूर्यादेवी मांडोदेवी परिसरातील हरदोली मार्गावर देवस्थानापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर एका विवाहित महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आढळला. या प्रकरणाचा तपास करण्याकरिता आज (दि.१५) आमगाव पोलीस जंगलात गेले असता मांडोदेवी ते तेढा या मार्गावर मांडोदेवी देवस्थानापासून अर्ध्या कि.मी.अंतरावर झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहेत काय? याचा पोलीस शोध घेत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या मांडोदेवी ते हरदोली मार्गावर रस्त्याच्या कडेला सालेकसा तालुक्यातील सालईटोला (बापूटोला) येथील काजल इंद्रराज राऊत (२२) या विवाहितेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताने माखलेला आढळला. याची माहिती आमगाव व सालेकसा पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. परंतु ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळला ते स्थळ आमगाव पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने आमगाव पोलिसांनी प्रकरण आपल्या हाती घेतले. सायंकाळ झाल्याने पोलीस परतले.
शनिवारीे (दि.१५) सकाळी पोलीस मांडोदेवीच्या जंगलात गेले असता आमगाव पोलिसांच्या हद्दीतच तेढा मार्गावर रस्त्याच्या कडेला जंगलात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला. तो तरुण सडक अर्जुनी तालुक्यातील जांभळी या गावातील आहे. त्या तरुणाचे नाव विलास शामराव कोचे (२५) रा.जांभळी (दोडके) असे आहे. या दोन्ही घटना एक कि.मी.अंतरावर असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. विलास हैदराबाद येथे कामाला होता. तो आता गावाकडे आला होता. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहेत काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. तरुणाची हत्या की आत्महत्या या दृष्टीने देखील आमगाव पोलीस तपास करीत आहेत.
तरुणी होती विवाहित
शुक्रवारी जंगलात रक्ताने माखलेल्या आणि मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणीचे लग्न गोरेगाव येथील युवकाशी मागीलवर्षी उन्हाळ्यात झाले होते. परंतु तीचे सासरच्याशी पटत नसल्याने आपल्या माहेरी राहात होती. ती साखरीटोला येथे संगणकाचे प्रशिक्षण घेत होती.