वडिलांचे घर जाळणारे दोन भाऊ गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:36 PM2018-09-27T23:36:07+5:302018-09-27T23:36:27+5:30
वडिलांच्या नावाने असलेले राहते घर आम्हा दोघा भावाच्या नावाने करुन दे असा तगादा लावून जन्मदात्या वडिलाला मारहाण करण्याची धमकी देवून घर जाळल्याची घटना बुधवारी (दि.२६) रात्री ८ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : वडिलांच्या नावाने असलेले राहते घर आम्हा दोघा भावाच्या नावाने करुन दे असा तगादा लावून जन्मदात्या वडिलाला मारहाण करण्याची धमकी देवून घर जाळल्याची घटना बुधवारी (दि.२६) रात्री ८ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा येथे घडली. दरम्यान वडिलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घर जाळणाऱ्या दोन्ही भावांना अटक केली.
प्राप्त माहितीनुसार माहुरकुडा येथील पुनीराम मुकुंदा कोल्हे हे पत्नी रेखा व मोठा मुलगा रुषी, सून नलीनी, मुलगी खुशी, लहान मुलगा हुमेश हे सर्व वडीलाच्या नावाने असलेल्या घरामध्ये एकत्र राहतात. लहान मुलाची पत्नी प्रियंका ही चार पाच महिन्यांपासून माहेरी राहत आहे. एकत्र राहत असलेले दोन्ही मुले राहते घर व शेतजमीन आमच्या नावाने करुन दे असा तगादा वारंवार वडील पुनीराम यांच्याकडे लावीत होते.
बुधवारला (दि.२६) दुपारी ४ वाजता वडील अर्जुनी-मोरगाववरुन गावाला परत आले. त्या वेळी मोठा मुलगा व सुनेचे भांडण सुरु होते. मुलगा व सुनेचे भांडण सुरु असताना वडीलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोठ्या मुलाने तुझ्यामुळेच आमचे भांडण होत आहेत. तुझ्या नावाने असलेले घर आमच्या नावाने करुन दे, दुसरी गाडी घेऊन दे असा मोठा भाऊ बोलत असताना लहान भावाने सुध्दा मोठ्या भावाच्या मागणीला प्रतिसाद दिला. शाब्दीक बोलणे सुरु असताना मोठ्या मुलाने स्वत:ची मुलगी खुशीला हातात पकडून माझ्या नावाने घर करुन दे, नाही तर खुशीला जमिनीवर आपटतो अशी धमकी वडीलाला दिली. वडीलांनी नातनीला सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोन्ही मुलांनी वडील पुनीरामला जीवे मारण्याची धमकी दिली.
या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पुनीराम यांनी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. दरम्यान तक्रार करुन गावाकडे परत येत असताना दोन्ही मुलांनी घरावर डिझेल टाकून व तणसीच्या सहाय्याने आग लावून जाळले.
पुनीराम कोल्हे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रुषीकुमार कोल्हे,हुमेशकुमार कोल्हे या दोघाही भावांविरुध्द भांदवीच्या कलम ४३६, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा करुन अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक माणीक खरकाटे करीत आहेत.