घरफोड्या करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक; ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला
By नरेश रहिले | Published: July 16, 2023 05:29 PM2023-07-16T17:29:22+5:302023-07-16T17:29:39+5:30
लगतच्या ग्राम फुलचूरपेठ येथील साई कॉलनीतील घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
गोंदिया : लगतच्या ग्राम फुलचूरपेठ येथील साई कॉलनीतील घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला असून चोरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ६१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
फिर्यादी दामोदर कुंजाम हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना ११ ते १३ जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी आलमारीतील सोन्याची अंगठी, गोप, रोख रक्कम, सॅमसंग कंपनीचा टॅब, एच.पी कंपनीचे गॅस सिलेंडर, ॲक्सिस बँकेचे सही केलेले दोन धनादेश, घरगुती किराणा सामान असा ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
ग्रामीण पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये दाखल केला होता. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या घटनेचा उलगडा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले होते व त्यांनी या प्रकरणात आतिश संतोष करोशिया (२८, रा. बाजपेयी वाॅर्ड) व यश ऊर्फ कान्हा राजकुमार खंडेलवाल (१९, रा.बाजपेयी वाॅर्ड) शुक्रवारी (दि.१४) ताब्यात घेतले.
विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली व त्यांच्याकडून पथकाने सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी टॅब किंमत १० हजार रुपये, एचपी कंपनीचा गॅस सिलिंडर किंमत एक हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एल ३९५५ किंमत ५० हजार असा एकूण ६१ हजार रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, जीवन पाटील, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, तुलसीदास लुटे, दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, पोलिस शिपाई संतोष केदार यांनी केली आहे.