इंटरसिटी गाडीत अनारक्षित तिकीट धारकांसाठी दोन कोचची व्यवस्था
By admin | Published: June 11, 2016 02:06 AM2016-06-11T02:06:13+5:302016-06-11T02:06:13+5:30
अनेक प्रवासी लांब टप्याचा रेल्वेने प्रवास करतात आणि आपल्या सोईनुसार काही दिवस आधीच सिट आरक्षित करतात.
देवरी : अनेक प्रवासी लांब टप्याचा रेल्वेने प्रवास करतात आणि आपल्या सोईनुसार काही दिवस आधीच सिट आरक्षित करतात. परंतु आवश्यकतेनुसार वेळेवर प्रवास करण्याची पाळी आल्यास आरक्षण न मिळाल्यामुळे प्रवास करताना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेशकुमार जैन यांच्या तक्रारीची दखल घेत नागपूर ते बिलासपूरपर्यंत धावणाऱ्या इंटरसिटी गाडीमध्ये अनारक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांकरिता दोन कोचची व्यवस्था करण्यात आली.
सविस्तर माहितीनुसार, देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेशकुमार जैन हे काही आवश्यक कामानिमित्त २७ फेब्रुवारीला सदर रेल्वे गाडीने नागपूर ते गोंदिया प्रवास केला. प्रवास करण्यासाठी सदर कोच क्रमांक ५/६ मधील आसन क्रमांक २३ जवळ गेले असता तिथे मासिक पासधारक महिला एकटीच बसलेली होती. आसन क्रमांक १७ ते २२ पर्यंत पूर्णपणे रिकामे होते. असे असतानासुद्धा सदर महिलेने जैन यांना त्या सिटवर बसू दिले नाही. कारण काय? तर आपले इतर मासिक पासधारक शासकीय कर्मचारी हे येणार आहेत. त्यांच्यासाठी हे आसन आरक्षित असल्याचे सांगतिले.
परंतु नियमानुसार दुसऱ्या पासधारकांसाठी असे करता येत नाही. या घटनेची तक्रार नरेशकुमार जैन यांंनी रेल्वे विभागाला केल्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विपिन वैष्णव यांनी जैन यांना पत्र पाठविले. तसेच रेल्वे प्रवास करताना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने बिलासपूर-इंटरसिटी एक्स्प्रेस गाडीच्या (१२८५६) बोगी- एस ६, ७ या दोन्ही कोचमध्ये सर्वच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची गरज नाही.
यामध्ये पहले आओ-पहले पाओ या धरतीवर आसन उपलब्ध आहे. प्रवास करताना कोणत्याही प्रकारची असुविधा प्रवाशांना होत असल्यास सुरक्षा हेल्प लाईन-१८२ किंवा सुविधा हेल्पलाईन-१३८ वर तक्रार करण्याचे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे.