प्रत्येकी ७० खाटांची दोन कोविड केअर सेंटर सुरु होणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:32+5:302021-04-20T04:30:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख सातत्याने वाढत आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेड्ससुद्धा हाऊसफुल्ल होत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख सातत्याने वाढत आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेड्ससुद्धा हाऊसफुल्ल होत आहेत. त्यामुळे रुग्णांना दाखल करण्यासाठी कुटुंबियांची मोठी तारांबळ उडत आहे. अशातच शहरात प्रत्येकी ७० खाटांची दोन कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. यामुळे कोविड रुग्णांना दाखल करण्याची समस्या थोडीफार कमी होणार आहे.
शहरातील स्वागत लॉन आणि सिंधी मनिहारी पंचायत येथे प्रत्येकी ७० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये काही प्रमाणात ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या दोन कोविड केअर सेंटरचे काम पूर्ण झाले आहे. या कामाची जिल्हाधिकारी दीपककुमार मीना व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली व तेथील सोयी-सुविधांवर समाधान व्यक्त केेले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णांना शासकीय व खासगी रुग्णालयांत वेळीच बेड मिळत नसल्याने प्राणास मुकावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बिकट चित्र निर्माण झाले आहे. अशात आता प्रत्येकी ७० खाटांची दोन कोविड केअर सेंटर सुरु झाल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या दाेन्ही कोविड केअर सेंटरमध्ये आयएमएचे डॉक्टरही सेवा देणार आहे. या संदर्भात त्यांची रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.