शिकारीसाठी सोडलेल्या करंटमुळे दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2022 08:49 PM2022-11-06T20:49:21+5:302022-11-06T20:51:58+5:30
लोखंडी गेट चोरून नेत असताना परसटोला पहाडीजवळ अज्ञात व्यक्तीद्वारे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्याने अनमोल गायकवाड़ व आशीष कोसरे हे दोघे खाली पडले. त्यांच्या मागे असणाऱ्या तिघा मित्रांनी त्यांना खेचून तारांच्या बाजूला केले व गावात येऊन घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांच्या मदतीने त्या दोघांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळेचे गेट रात्रीच्या अंधारात चोरून नेत असताना जंगलात शिकारीसाठी लावलेले करंट लागून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेले तिघे थोडक्यात बचावले. शनिवारी (दि. ५) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास शहराजवळील परसटोला पहाडीजवळ ही घटना घडली. अनमोल नंदलाल गायकवाड़ (वय २२) व आशीष मुन्ना कोसरे (२८, रा. परसटोला, प्रभाग क्रमांक १६) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनमोल गायकवाड़, आशीष कोसरे व त्यांचे तीन मित्र मनोहर कुंजाम, बबलू माहुरकर आणि श्याम भारती यांनी एमआयडीसी परिसरात बंद अवस्थेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे लोखंडी गेट आरीने कापले. लोखंडी गेट चोरून नेत असताना परसटोला पहाडीजवळ अज्ञात व्यक्तीद्वारे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्याने अनमोल गायकवाड़ व आशीष कोसरे हे दोघे खाली पडले. त्यांच्या मागे असणाऱ्या तिघा मित्रांनी त्यांना खेचून तारांच्या बाजूला केले व गावात येऊन घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांच्या मदतीने त्या दोघांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. फिर्यादी मनोहर रूपसिंग कुंजाम यांच्या तोंडी रिपार्टवरून देवरी पोलिसांनी अनमोल व आशिष यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार रेवचंद सिंगनजुड़े यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद घाडगे तपास करीत आहेत.
चार वर्षांपासून शाळा बंद, दारे व खिडक्या चोरीला
- शहराला लागून असलेल्या मोठा परसटोलाजवळील जिल्हा परिषद शाळेचे गेट चोरून नेत असताना करंट लागून अनमोल व आशिषला जीव गमवावा लागला. ही शाळा पटसंख्येच्या अभावामुळे मागील चार वर्षांपासून बंद आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे शाळेची इमारत बेवारस अवस्थेत असल्याने चोरांनी या शाळेच्या खिडक्या व दरवाजे केव्हाचेच लंपास केले आहेत. शिल्लक असलेले गेट शनिवारी रात्री चोरून नेत असताना ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रोजगार नसल्याने वाढले चोरीचे प्रमाण
- परसटोलामध्ये एमआयडीसी स्थापन होऊन बरीच वर्षे झाली. मात्र फक्त एक कारखाना स्थापन झाला असून, त्यामध्येसुद्धा या गावातील एकाही बेरोजगार युवकास रोजगार न मिळाल्याने बरेच युवक गैरमार्गाने पैसा मिळविण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावत आहेत. एमआयडीसीमध्ये युवकांना रोजगार केव्हा मिळणार? हा संतप्त सवाल युवक उपस्थित करीत आहेत.
आरोपीला शोधण्यास पोलिसांना करावे लागणार शर्तीचे प्रयत्न
एमआयडीसी परिसराजवळ जंगली जनावरांची शिकार करण्याच्या हेतूने अज्ञात आरोपीने इलेक्ट्रिक करंटच्या तारा खाली सोडल्या होत्या. त्या तारांना स्पर्श झाल्याने अनमोल व आशिष यांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी त्या अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, शोध घेतला जात आहे. मात्र, आता हा प्रकार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.