सभापतीच्या दोन्ही मुली जि.प.च्या शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:52 AM2017-07-18T00:52:12+5:302017-07-18T00:52:12+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे ‘झोलबा पाटलाचा वाडा’ अशी अनेक वर्षांपासून लोकांची समज आहे.
इतरांसाठी आदर्श : जिल्ह्यासाठी प्रेरणादायी पाऊल
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे ‘झोलबा पाटलाचा वाडा’ अशी अनेक वर्षांपासून लोकांची समज आहे. त्यामुळे स्वत: जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये शिक्षण देतात. मात्र आता जि.प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी पाऊल उचलले आहे. त्यात सर्वांसाठी आदर्श म्हणून स्वत: एका जि.प. सभापती यांनी आपल्या दोन मुलींना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठविले.
मागील दोन तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवून लोकांमध्ये रुजलेला भ्रम तोडण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला. परंतु याचा प्रत्यक्षात काही प्रभाव पडला नाही आणि कान्व्हेंट संस्कृतीच्या जाळ्यात पालक वर्ग दिवसेंदिवस फसत चालला. मात्र अधिकारी, पदाधिकारी वेळोवेळी विचारमंथन करून जि.प. शाळांकडे पालकांचा कल वाढविण्यासाठी पाऊल उचलताना दिसून आले. यात स्वत: जि.प.च्या शिक्षकाने आपल्या मुलांना जि.प.च्याच शाळेत पाठवावे, अशीही आग्रही भूमिका घेण्याचे ठरविले. परंतु सुरुवात कोणी करायची आणि कोठून करायची, असा प्रश्न नेहमी उद्भवत राहीला.
अशा परिस्थतीत जिल्हा परिषद गोंदियाचे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये यांनी आपल्या दोन्ही मुलींना जि.प.च्या शाळेत पाठवून सगळ्यांनाच सर्वांसमोर आदर्श ठेवला. आता आपणही जि.प. च्या शाळेत आपल्या मुलांना पाठविले पाहिजे, यावर विचार करण्यास सर्वांना भाग पाडले आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या दोन्ही मुली जि.प. च्या शाळेत जावून हुशार बनत आहेत. भविष्यात काहीतरी करण्याच्या जिद्दीने अभ्यास करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. यामुळे वडगाये हेसुद्धा स्वत:ला समाधानी मानत आहेत.
सभापती पदावर मागील दोन वर्षांपासून ते पदासिन आहे. सभापती वडगाये यांची मोठी मुलगी प्रणिता आठवीत गेली असून लहान मुलगी विद्या तिसऱ्या वर्गात आहे. दोन्ही मुली आनंदाने जि.प.च्या शाळेत शिकत आहेत.
वडगाये सालेकसा जवळील सोनारटोला गावातील रहिवासी आहेत. केव्हाही कुठेही लोकांच्या सुखदु:खात सहभागी होण्यासाठी नेहमी जातात. त्यामुळे पक्षाचे असो की विरोधी पक्षाचे असोत, प्रत्येकाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. दोन्ही मुली हुशार आहेत, तरी त्यांनी त्यांना कान्व्हेंटमध्ये न पाठविता जि.प.शाळेत पाठविण्याचा निर्धार केला.
शाळेत प्रशिक्षित शिक्षकांसह इतर सोईसुविधा
जि.प.च्या शाळेत सोईसुविधा पुरेशा असून सतत नवनवीन उपक्रम शासनाकडून राबविले जातात. जि.प. शाळेचे शिक्षक प्रशिक्षित असून वेळोवेळी त्यांना गरजेनुसार प्रशिक्षण मिळत असते. त्यामुळे नवसृजनात्मक बाबीसुद्धा जि.प.च्या शाळेत घडतात. सध्या सुरू असलेले ज्ञानरचनात्मक, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजिटल शाळा इत्यादी नवोपक्रमांमुळे मुलांच्या ज्ञानात भर पडत आहे. एवढेच नाही तर अभ्यासाची आवडसुद्धा वाढत आहे. अशात जि.प.च्या शाळेत मुलांना शिकविणे त्यांच्या भविष्यासाठी जास्त हितकारक आहे, असे सभापती देवराज वडगाये यांचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धीक वाढीसाठी पोषक वातावरण आहे. तसेच जि.प.च्या शाळेत विद्यार्थ्यांच्या मनावर कोणतेही दडपण राहत नाही.
- देवराज वडगाये
सभापती, जि.प. गोंदिया