गोलू तिवारी हत्याकांडातील दोन बंदूक अन् सात काडतूस जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 04:07 PM2024-04-27T16:07:22+5:302024-04-27T16:12:47+5:30
पोलीस कोठडीत अनेक गोष्टींचा उलगडा: आणखी आरोपी अडकणार का?
गोंदिया : आर्थिक देवाण-घेवाणीवरून व धरम दावने याच्या खुनाचा राग धरून दोन दुचाकीवरून असलेल्या चार जणांनी कुडवा नाकाजवळील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर रोहित उर्फ गोलू हरिप्रसाद तिवारी (३८, रा. गजानन कॉलनी, गोंदिया) यांच्यावर गोळ्या झाडून सोमवारी (दि.२२) रात्रीच्या सुमारास खून केला. गोलू तिवारी हा खुनाच्या प्रकरणात आरोपी असून, तो जामीनावर असताना त्याचा गेम करण्यात आला. त्याच्या हत्येसाठी आणलेल्या दोन बंदूक आणि सात जीवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत.
सन २०१२ ला धरम दावने याच्या खून प्रकरणात गोलू तिवारी याचा सहभाग असल्याने ते प्रकरण न्यायालयात सुरू असतानाच जामीनावर असलेला गोलू तिवारी याचा गोळी झाडून खून करण्यात आला. गोलू तिवारी याच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपी मोहीत दिलीप मराठे (३६) रा. संजयनगर गोंदिया, राजेंद्र उर्फ बंटी शंकर दावने (४२), हिरो शंकर दावने (४२) दोन्ही रा. दसखोली गोंदिया, शिवानंद उर्फ सुजल सदानंद भेलावे (१९) रा. कृष्णपुरा वॉर्ड गोंदिया, विनायक रविंद्र नेवारे (२१) रा. गिरोला (पांढराबोडी), रितेश उर्फ सोंटू संजय खोब्रागडे (२३) कस्तुरबा वॉर्ड कचरा मोहल्ला गोंदिया, सतिश सुग्रीव सेन (२३) रा. पन्नानगर जबलपूर मध्यप्रदेश या सात जणांना अटक करण्यात आली.
आरोपींवर भादंविच्या कलम ३०२, ३४, सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम ३७ (अ) १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे व त्यांच्या चमूने आरोपींकडून या गुन्ह्यात वापरलेली दोन बंदूक व सात जीवंत काडतूस २५ एप्रिल रोजी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असून या प्रकरणात आरोपींकडून अनेक बाबींचा उलगडा करण्यात आला आहे. गोलू प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे असे पत्रपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर यांनी सांगितले होते. या प्रकरणाचा तपास जसाजसा पुढे जात आहे तशी तशी पुरावे सबळ करण्याच्या दृष्टीने पोलिसांना मोठ्या प्रमाणात मिळत आहेत.