Corona Virus in Gondia; लॉकडाऊनमुळे मजुरांचा दोनशे कि.मी.चा पायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 07:57 PM2020-03-27T19:57:22+5:302020-03-27T19:59:50+5:30
मध्यप्रदेशातील मंडला मजुरांना गावाकडे परतण्यासाठी कुठलेही साधन न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेपासून गोंदिया ते मंडला हे दोनशे कि.मी.चा प्रवास रेल्वे मार्गाने पायीच सुरू केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने २१ दिवसांच्या लॉक डाऊन केला आहे. परिणामी सर्वच रेल्वेसह सर्वच वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे मजुरीसाठी दुसऱ्या शहर व राज्यात गेलेल्या मजुरांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. मध्यप्रदेशातील मंडला मजुरांना गावाकडे परतण्यासाठी कुठलेही साधन न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेपासून गोंदिया ते मंडला हे दोनशे कि.मी.चा प्रवास रेल्वे मार्गाने पायीच सुरू केला.
मध्यप्रदेशातील मंडला बैयर येथील १३ मजूर मुंबई येथे मजुरीच्या कामासाठी गेले होते. मात्र कोरोनामुळे तेथील काम बंद झाल्याने त्यांना संबंधित ठेकेदाराने गावाकडे परत जाण्यास सांगितले. त्यामुळे हे सर्व मजूर २४ मार्च रोजी गोंदिया येथे कसे तरी पोहचले. मात्र यानंतर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन व राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. तर रेल्वेसह इतर वाहतूक ठप्प झाली. खासगी वाहने सुध्दा बंद असल्याने त्यांना मंडला बैयर येथे जाण्याची अडचण निर्माण झाली. त्यांनी गोंदिया येथे दोन दिवस कसे बसे काढले. मात्र आता त्यांच्याकडील पैसे संपल्याने आणि जेवणाची देखील सोय नसल्याने उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान शुक्रवारी पहाटे ४ वाजताच या सर्व १३ मजुरांनी पायीच आपल्या गावाला जाण्याचा निर्धार केला. यानंतर गोंदियाहून बालाघाटकडे जाणाºया रेल्वे मार्गाने त्यांनी आपल्या सामानासह गोंदिया ते मंडला बैयर या दोनशे किमीच्या पायी प्रवासाला सुरूवात केली. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय असून यात काही लहान मुलांचा सुध्दा समावेश आहे.लॉकडाऊनमुळे सध्या विविध राज्यात कामासाठी गेलेले मजूर आपल्या गावाकडे परतत असताना अनेक ठिकाणी फसले आहे. मात्र शासनाने अद्यापही अशा लोकांची कुठलीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे या मजुरांना उपाशी तापाशी आणि पायी आपले गाव गाठण्याची वेळ आली आहे.