अस्तित्वासाठी जंगलाच्या दोन वाघांची झुंज; टी-९ वाघाचा मृत्यू
By नरेश रहिले | Published: September 22, 2024 09:41 PM2024-09-22T21:41:10+5:302024-09-22T21:41:20+5:30
नागझिरा अभयारण्याच्या नागदेव पहाडीजवळील घटना
गोंदिया: वाघ आपल्या अस्तीत्वासाठी दुसऱ्या वाघाशी झुंज करतो. ह्या नैसर्गीक नियमाची प्रचिती २२ सप्टेंबर रोजी आली. दोन वाघांच्या झुंजीत तरूण वाघाने वृध्द वाघावर हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना रात्रीच घडली असावी. २२ सप्टेंबर रोजी सकाळी वनकर्मचारी गस्तीवर गेले असतांना त्यांना ११ ते १२ वर्ष वयेागटातील वाघ गंभीर जखमी अवस्थेत मृतावस्थेत आढळला.
वनपरिक्षेत्र नागझिरा अभयारण्य अंतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा १, कक्ष क्र. ९६ मधील मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात बिटरक्षक जे.एस. केंद्र, नागझिरा १ हे आपल्या चमूसह नियमीत गस्ती वर असतांना साधारणतः सकाळी १० वाजता नर वाघ ९ ते १० वर्षाचा मृतावस्थेत आढळला. या घटनेची माहिती बिटरक्षक केंद्रे यांनी तत्काळ वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली. नागझिरा अभयारण्याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या नवीन वाघाने नागझिरा अभयारण्याच्या आत नागझिरा चौकशी सेंटरच्या जवळ २ किमी अंतरावर नागदेव पहाडीच्या कपार्टमेंट नंबर ९६ जवळ रात्री दुसऱ्या वाघाशी झुंज केली. ज्या वाघाने ठार केले ४ ते ५ वर्षाचा असावा. नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी वनकर्मचारी त्या भागात गेले असतांना ९ ते १० वर्षाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला.
गस्त करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जयरामे गौडाआर, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र उपसंचालक राहुल गवई, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, सहाय्यक वनसंरक्षक एम.एस.चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. भोसले हे घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभुत कार्यपध्दतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळ परिसराची व मृत वाघाची पाहणी करण्यात आली. सदर समितीमध्ये मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, एनटीसीए रुपेश निंबार्ते, छत्रपाल चौधरी, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. शितल वानखेडे, डॉ. सौरभ कवठे, डॉ. समिर शेंद्रे, डॉ. उज्वल बावनथडे यांचा समावेश होता.
व्हिसेरा उत्तरीय तपासणीसाठी पाठविला
पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या चमुद्वारे समिती सदस्यांचे उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. वाघाचे व्हिसेरा नमुने उत्तरीय तपासणी करीता संकलित करण्यात आले आहेत.
सर्व अवयव साबूत
मृत वाघ हा टी-९ असून आपसी झुंजीमध्ये गंभीररित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडला असावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकिय अधिकारी यांनी वर्तविलेला आहे. मृत वाघाचे सर्व अवयव साबूत आहेत. शवविच्छेदानंतर वाघाचे पंचासमक्ष दहन करण्यात आले आहे.