वांगी शेतकऱ्यांकडून दहाला दोन किलो; ग्राहकांना मिळतायेत दहाला एक किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:31 AM2021-08-26T04:31:38+5:302021-08-26T04:31:38+5:30
गोंदिया : भाजीपाल्याची शेती करणे अत्यंत अवघड आहे. पाण्याचे संकट, पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव व अत्यंत महागडी कीटकनाशके यामुळे ...
गोंदिया : भाजीपाल्याची शेती करणे अत्यंत अवघड आहे. पाण्याचे संकट, पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव व अत्यंत महागडी कीटकनाशके यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घेणे आता शेतकऱ्यांना परवडत नाही. अत्यंत महागडी औषधे फवारणी करून पिके वाचविल्यावरही येणाऱ्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने राबराब राबूनही शेतकऱ्यांच्या अंगावरील कर्जाचे ओझे तसेच राहत आहे.
शेतकरी फळ, भाज्यांचे उत्पादन घेत असताना शेतीच्या मशागतीसाठी लागणारी मजुरी, पिकांचे नियंत्रण व संरक्षण करण्यासाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात येतो. परंतु शेवटी शेतकऱ्याने त्या गोष्टीचा लेखाजोखा केल्यास, त्याच्या हातात काहीच शिल्लक उरत नाही. कर्ज घेऊन शेती करणे आता शेतकऱ्यांना कठीण होत आहे. शासनाने शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पाच रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून घेतलेली वांगी बाजारात दहा रुपये किलो दराने विक्री केली जातात.
...................
शेतकऱ्यांचाही खर्च निघेना
भाजीपाला पिकवताना बियाणे महागडी आहेत. त्यांच्या मशागतीसाठी येणारा मजुरीचा दर अधिक असल्याने कठीण होत आहे. लावलेल्या पिकांना फळे किंवा भाजीपाला निघेपर्यंत सुरुवातीपासून देखरेख व अत्यंत महागडी औषधे लागत असल्याने भाजीपाल्याचीही शेती करणे आता परवडत नाही.
- विजय कुसन कोरे, शेतकरी
...................
मजुरी वाढली, बियाणे व औषधीही वाढली. मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. मेहनत करणारा शेतकरीेच नाडवला जातो. आमच्याकडून अर्ध्या किमतीत घेऊन दुप्पट किमतीत विक्री करणाऱ्यांचाच फायदा होतो. दलाल व भाजी विक्रेतेच फायद्यात आहेत.
- दिलीप महारवाडे, शेतकरी, किडंगीपार
.......................
ग्राहकांना परवडेना
भाजीपाल्याच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने घर चालविण्यासाठी हिरव्या भाजीपाल्याबरोबर अधुनमधून कडधान्यांचा आधार घ्यावा लागतो. प्रत्येक भाजीचा दर वाढल्याने गृहिणींचे घरचे बजेट बिघडले आहे.
- जयवंता रामटेके, किडंगीपार
...............
आर्थिक मिळकत थांबली आहे. मात्र महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यात दैनंदिन गरज भागविताना भाजीपाला खरेदी करणे म्हणजे नाकी नऊ येते. परंतु पोट भरण्यासाठी भाजीपाला खरेदीच करावा लागतो.
- योगेश खोटेले, डोंगरगाव
...................
भावात एवढा फरक का?
भाजीपाल्याचे उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल बाजारात दुप्पट दराने का विक्री केला जातो, याची पडताळणी केली असता, त्या मालाची वाहतूक करण्यासाठी लागणारा ट्रान्स्पोर्ट चार्ज, महागलेले डिझेल, दलालांची कमाई व किरकाेळ विक्रेत्यांची कमाई हे त्यात नमूद असल्याने शेतकऱ्यांकडून घेतलेला माल दुपटीने विकला जातो आहे.
...................
कोणत्या भाजीला काय भाव?
भाजीपाला--------शेतकऱ्यांचा भाव-----------ग्राहकाला मिळणारा भाव किलो
वांगी---------------------०५------------------------------१०
टोमॅटो---------------------१०-----------------------------१५
भेंडी------------------------८------------------------------१५
चवळी---------------------१२------------------------------३०
पालक---------------------४०------------------------------७०
कोथिंबीर---------------------८०------------------------------१२०
हिरवी मिरची--------------------२५-----------------------------४०
पत्ताकोबी--------------------१०------------------------------२०
फूलकोबी---------------------१८------------------------------३०
दोडका---------------------१६------------------------------३०