बँकेने दिला दोन हजारांऐवजी दोन लाखांचा विड्रॉल
By admin | Published: July 14, 2017 01:06 AM2017-07-14T01:06:37+5:302017-07-14T01:06:37+5:30
बँक आॅफ महाराष्ट्र सालेकसा शाखेत १० जुलै रोजी कॅशियरने ३७ हजारांचा विड्रॉल देत असताना चक्क दोन लाख ३५ हजारांचा विड्रॉल दिला.
महाराष्ट्र बँकेतील प्रकार : महिला ग्राहकाने दुसऱ्या दिवशीच केला परत
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : बँक आॅफ महाराष्ट्र सालेकसा शाखेत १० जुलै रोजी कॅशियरने ३७ हजारांचा विड्रॉल देत असताना चक्क दोन लाख ३५ हजारांचा विड्रॉल दिला. या प्रकारामुळे सायंकाळी उशिरापर्यंत बँकेत एकच तारांबळ उडाली. मात्र सीसीटीव्ही फुटेजचा अंदाज घेत त्या महिला ग्राहकाच्या घरी जावून रक्कम परत घेण्यात आली.
१० जुलै रोजी लीला संदीप डोंगरे या महिलेने बँक आॅफ महाराष्ट्रच्या सालेकसा शाखेत ३७ हजार रूपये काढण्यासाठी विड्रॉल फॉर्म भरला. सकाळी १० वाजता बँकेत गेलेल्या लीला डोंगरे यांना लिंक फेलमुळे रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. लिंक फेलमुळे सर्वांनाच उशिरा रक्कम मिळू लागली. त्यामुळे बँकेचे कॅशियरसुद्धा घाईघाईने विड्रॉल देऊ लागले. जेव्हा लीला डोंगरे यांना विड्रॉल देण्याची पाळी आली तेव्हा कॅशियरने शंभर रूपयांच्या नोटांचे प्रत्येकी १० हजार रूपयांचे तीन बंडल्स असे ३० हजार रूपये व ५० रूपयांच्या नोटांचे पाच हजार रूपयांचे एक बंडल असे एकूण ३५ हजार रूपये काढून दिले. मात्र ३७ हजार रूपये करण्यासाठी पुन्हा दोन हजारासाठी २० रूपयांच्या १०० नोटांचा बंडल समजून त्याने चक्क दोन हजार रूपयांच्या नोटांचा एक बंडल म्हणजे सरळ दोन लाख रूपये देऊन टाकले. त्यामुळे त्या महिलेला ३७ हजार रूपयांऐवजी एकूण दोन लाख ३५ हजार रूपये देण्यात आले.
सदर महिला सालेकसा येथील असून तिचा हल्ली मुक्काम गोंदिया येथे आहे. त्यामुळे ट्रेनची वेळ झाली म्हणून रकमेची मोजणी न करता रक्कम सरळ बॅगमध्ये घालून ट्रेनने गोंदियाला निघून गेली. घरी गेल्यावर तिने रक्कम मोजली, तेव्हा दोन लाख रूपये अतिरिक्त रक्कम मिळाल्याचे लक्षात आले. ही बाब तिने आपल्या पतीला सांगितल्यावर दोन्ही अस्वस्थ झाले. सकाळी उठून त्यांनी गोंदियातील एका टीव्ही चॅनलच्या पत्रकाराला फोनवर प्रकरण सांगितले. तेव्हा सदर अतिरिक्त रक्कम बँसेत जाऊन परत करण्याचे ठरविले. सीसीटीव्ही फुटेजमुळे आपण असेच पकडले जाणार, याची भीतीसुद्धा त्यांना वाटत होती.
इकते बँकेत सायंकाळी उशिरापर्यंत विड्रॉलचे काम संपल्यानंतर कॅशियरने रकमेची टॅली केली. तेव्हा चक्क दोन लाखांचा फरक दिसून आला. आपण कोणत्यातरी ग्राहकाला दोन लाख रूपये अधिकचे दिले, असे समजल्यावर त्याने दिवसभराचे सीसीटीव्ही फुटेज बघितले. तेव्हा लीला डोंगरे यांना अतिरिक्त दोन लाख रूपये गेले असावे, असे लक्षात आले. ही बाब त्याने शाखा व्यवस्थापक शिरीष देशपांडे यांच्या लक्षात आणून दिली.
दुसऱ्या दिवसी सकाळी लीला डोंगरे आपल्यासह सदर रक्कम परत करायला घरून निघत असतानाच बँकेचे व्यवस्थापक व कॅशियर दोघेही तिच्या घरी पोहोचले व रकमेची चौकशी केली. तेव्हा लीला डोंगरे यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत रक्कम असल्याचे कबूल केले व परत आणून देण्याच्या तयारीत होते, असे सांगितले. सर्वजन दोन लाखाच्या रकमेसह सालेकसाला आले व व्यवस्थापकांच्या कक्षात त्या महिलेने दोन लाख रूपये व्यवस्थापक व कॅशियर यांच्याकडे सुपूर्द केले.