दाढीला हात लावण्यासाठी हातांनी भाेगला दोन महिन्यांचा वनवास ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:15+5:302021-06-05T04:22:15+5:30
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षीपासून तळहातावर कमवून खाणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. कधी लॉकडाऊन लागेल आणि पोट भरणे ...
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षीपासून तळहातावर कमवून खाणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. कधी लॉकडाऊन लागेल आणि पोट भरणे कधी मुश्कील होईल हे आज घडीला सांगता येत नाही. अशीच धास्ती छोट्या-छोट्या व्यावसायिकांमध्ये झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे पोट भरणे अत्यंत कठीण झाले आहे. दररोज १० ते १५ लोकांची कटींग, दाढी करून आपले जीवन जगणाऱ्या कारागिरांचे हात दाढीला लावण्यासाठी आतुरलेेले होते. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे नाभिकांची दुकाने बंदच होती. परंतु घरी दाढी करणाऱ्या कारागिरांकडे कुणीच भटकले नाहीत. यामुळे पोट भरण्यासाठी रोजगार हमी योजनेचे काम,घरकूल बांधकामाची मजुरी करून पोट भरावे लागले.
आमगाव तालुक्याच्या जवरी येथील रितेश मेश्राम यांच्याशी चर्चा केली असता त्याने कोरोना काळातील अत्यंत परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले. मागच्यावर्षी कोरोनाच्या संकटाने दोन महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु पूर्वीपासून कमवून ठेवलेले काही पैसे जवळ असल्याने मागच्या वर्षी दोन महिने लॉकडाऊन असतानाही त्रास झाला नव्हता. परंतु यंदा एप्रिल व मे या दोन महिन्यातील संचारबंदीने आमची हालत खस्ता झाल्याचे सांगितले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये जे कमावून ठेवले होते ते गेले. त्या प्रक्रियेतून सावरण्याचा प्रयत्न असताना लॉकडाऊन खुलल्यानंतरही ग्राहक भटकत नव्हते. दिवसभर वाट पाहून दोन-चार ग्राहक आले त्यातून मिळालेल्या मिळकतीतून घर चालविण्याचा प्रयत्न असायचा. यातून हात उसनवारी वाढली.
...........
आंबील चटणीवर काढले दिवस
कटींग, दाढी करून येणाऱ्या मिळकतीतूनच घर संसार चालवित असतो. दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने मोठा त्रास झाला. त्यातच यंदा दुसऱ्यांदा कोरोनामुळे संचारबंदी झाल्याने पोट भरणे मुश्कील झाले. सरकारनेही मदत केली नाही. हाताला काम नाही, पोटाची आग विझवावी कशी? कुणी उसनवारीवर पैसे किंवा साहित्य देत नव्हते. यातच कशीबशी ओढाताण करून आंबील, चटणीवर दिवस काढले.
.............
मजुरी करुन केला उदरनिर्वाह
सरकारने ग्रामीण भागात घरकूल दिलेत त्या घरकुलाच्या कामावर जाऊन आपल्या कुटुंबाचे पोषण केले. पारंपरिक व्यवसाय करताना आमच्या व्यवसायाला कुणाची मदत मिळाली नाही. १४ महिन्याच्या काळात चार महिने आमचा व्यवसाय बंद ठेवावा लागला. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे पोषण करावे कसे? साहित्याच्या किमती वाढल्याने खर्च वाढला परंतु उत्पन्न अत्यल्प असल्याने संसाराचा गाडा कसा रेटायचा हा प्रश्न असल्याचे रितेश मेश्राम यांनी सांगितले.