आणखी दोघा आरोपींना केले तडीपार; आरोपींच्या तडीपारीचा आकडा वाढताच, तीन महिन्यांसाठी राहणार जिल्हा हद्दीबाहेर
By कपिल केकत | Published: February 29, 2024 08:41 PM2024-02-29T20:41:24+5:302024-02-29T20:41:32+5:30
जिल्हा पोलिसांकडून आरोपींच्या तडीपारीची कारवाई सुरू असून हा आकडा वाढतच चालला आहे.
गोंदिया: जिल्ह्यातील गुन्हेगारांवर अंकुश बसविण्यासाठी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी कंबर कसली असून, जिल्हा पोलिसांनी तसे आदेश दिले आहेत. यातूनच जिल्हा पोलिसांकडून आरोपींच्या तडीपारीची कारवाई सुरू असून हा आकडा वाढतच चालला आहे. अशातच दवनीवाडा पोलिसांनी आणखी दोघा सराईत गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी तडीपार केले आहे.
दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बिर्सी येथील रहिवासी आरोपी रामेश्वर उर्फ छोटू आसाराम हटेले व ग्राम मुरदाळा येथील रहिवासी दिलीप सकटू मस्करे (५१) यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांवर कित्येकदा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात काहीच सुधारण होत नव्हती. परिणामी परिसरातील लोकांमध्ये दहशत असून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. यावर दवनीवाडा पोलिसांनी त्यांना हद्दपार करण्यासाठी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ कलम ५७ (अ), (१) अन्वये हद्दपार प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांनी दोन्ही प्रस्तावांची प्राथमिक चौकशी पूर्ण करून आरोपींना दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याची शिफारस केली होती. मात्र उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दोघांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले व तसे आदेश बुधवारी (दि.२८) काढले.
दोघांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत दाखल
यातील आरोपी रामेश्वर आसाराम हटेले याच्यावर मारहाण करून दुखापत करणे, जातीवाचक शिवीगाळ करून धमकी देणे, जीवे ठार करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच दिलीप सकटू मस्करे याच्याविरुद्ध अवैधरीत्या दारूविक्री, गैरपणे अटकाव करणे, विनयभंग, बलात्कार करणे, दुखापत, हमला करण्याची तयारी करून गृह अतिक्रमण करणे अशा प्रकारचे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.