आणखी दोन इमारत, गोदामाला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:56+5:302021-02-16T04:30:56+5:30
गोंदिया : मालमत्ता करवसुलीसाठी मालमत्तांना सील ठोकण्याचा धडाका सुरू असतानाच कर वसुली पथकाने सोमवारी (दि.१५) शहरातील पन्नालाल दुबे वॉर्ड ...
गोंदिया : मालमत्ता करवसुलीसाठी मालमत्तांना सील ठोकण्याचा धडाका सुरू असतानाच कर वसुली पथकाने सोमवारी (दि.१५) शहरातील पन्नालाल दुबे वॉर्ड क्रमांक-२५ मध्ये २ इमारत व गोदामाला सील ठोकले. करवसुली पथक आता रहिवासी भागात कारवाया करीत असल्याने थकबाकीदारांत धडकी भरली आहे.
सोमवारी करण्यात आलेल्या कारवायांतर्गत, पथकाने पन्नालाल दुबे वॉर्डातील रहिवासी सविता प्रमोद जैन यांची इमारत सील केली. त्यांच्यावर सन २०१६-१७ पासून एक लाख १५ हजार ४०९ रुपयांची थकबाकी आहे. या कारवाईअंतर्गत पथकाने इमारतीतील इक्वेशन क्लास व भाड्याने असलेले एक कार्यालयही सील केले आहे. तसेच याच वॉर्डातील रतनचंद रिखीलाल जैन यांच्या इमारत व गोदामाला सील ठोकले. त्यांच्यावर सन २०१५-१६ पासून एक लाख २३ हजार ११८ रुपयांची थकबाकी आहे. हेमराज पन्नालाल बोपचे यांच्या मालकीचे बी. एम. पटेल वॉर्डातील दुकानाचे शटर पाडण्यात आले होते. तसेच मनोहरभाई पटेल वॉर्डातील कुरेशा बेगम इस्माईल कुरेशी यांच्यावर अधिपत्र व एक दिवसीय जप्ती वॉरंट बजाविण्यात आले आहे. त्यांच्यावर सन २००३-०४ पासून ७२ हजार ७२९ रुपयांची थकबाकी आहे.