जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खून
By admin | Published: May 25, 2017 12:48 AM2017-05-25T00:48:45+5:302017-05-25T00:48:45+5:30
जिल्ह्यात बुधवारी खूनाच्या दोन घटना नोंदविण्यात आल्या. पहिली घटना अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या देऊळगाव-बोदरा येथील....
गस्तीवर असलेल्या वनरक्षकाची हत्या : शेतजमीन खरेदी व्यवहारावरून आठ आरोपी ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव/सालेकसा :जिल्ह्यात बुधवारी खूनाच्या दोन घटना नोंदविण्यात आल्या. पहिली घटना अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या देऊळगाव-बोदरा येथील तर दुसरी सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खडखडीटोलाच्या नाल्यावरील आहे.
शेतजमीन खरेदी विक्री सौद्याच्या व्यवहारापासून झालेल्या भांडणातून खून केल्याचा आरोपावरुन शेतजमिनीची विक्री करवून घेणाऱ्या आठ जणांंना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवलाल नारायण भांडे (४३) असे मृताचे नाव आहे. आज बुधवारी ही घटना उघडकीस आली. देऊळगाव-बोदरा येथील शिवलाल भांडे या शेतकऱ्यांने एक वर्षापूर्वी आपल्या मालकीच्या शेतजमिनीपैकी अर्धा एकर शेती अंतारामझोळे यांना सप्टेंबर २०१६ मध्ये विक्री केली. त्या जमिनीच्या मोबदल्यात मिळणारा पैसा त्यांनी एकाच वेळी दिला नाही. मृतक शिवलाल त्यांना वारंवार पैशाची मागणी करायचा. शेतजमीन विक्री करतेवेळी शिवलालची पत्नी मंदा भांडे (३०) यांनी संबधीताकडे आक्षेप नोंदवून जमिनीची विक्री रद्द करावी, अशी लेखी तक्रार केली होती. १७ मे २०१७ रोजी परत एक एकर शेतजमिनीची विक्री झोळे परिवाराने शिवलाल भांडे याचेकडून करवून घेतली. शेतजमिनीच्या विक्री सौद्यामधील एकही रुपया आम्ही पाहिला नाही असे मृतकाची पत्नी, आई व बहिणीचे म्हणणे आहे. प्रती एकर ४ लाख ८० हजार रुपयाप्रमाणे सौदा झाल्याचेसांगितले जाते. दुसऱ्यांदा विक्री झालेल्या शेतजमिनी प्रकारावर सुध्दा पत्नीने आक्षेप नोंदविला. परंतु तक्रारीची साधी चौकशी करण्याची तत्परता निष्ठूर अधिकाऱ्यांनी दाखविली नाही. घटनेच्या दिवशी घरचे लेक अंगणामध्ये झोपले असता सकाळी उठल्यानंतर घरामध्ये शिवलाल मृतावस्थेत पडलेला दिसला. त्याच्या डोक्याला जखम होऊन रक्ताने केस गुरफटलेले होते. घरामध्ये रक्ताचा डाग होते. माझ्या पतीचा खून करण्यात येवून घरामध्ये प्रेत आणून ठेवल्याचा आक्षेप करून पतीच्या खूनात अंताराम झोळे, दिनेश झोळे, देवानंद झोळे, प्रभू झोळे, माधोराव झोळे, रितेश झोळे, रेखा झोळे, हेमराज बोरकर यांचा समावेश असल्याची तक्रार पोलिसांनी नोंदविली. भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
दुसरी घटना सालेकसा तालुक्यातील पिपरिया बीटवर वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले रविंद्रसिंह जतपेले (५०) यांचा खडखडीटोलाच्या नाल्याच्या किनाऱ्यावर उभारीने मारून खून करण्यात आला. सदर घटना काल (दि.२३) मे च्या रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान घडली. असंतुष्ट लाकूड तस्करानीच रविंद्रसिंगची हत्या केली असावी असा अंदाज वन विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे. सदर घटना जंगलालगत शेतीशिवारात घडली. हा भाग नक्षलदृट्या संवेदनशील असल्याने विविध चर्चेला ऊत आले आहे.
रविंद्रसिंह ज्ञानीसिंह जचपेले (५०) हे मागील दोन वर्षापासून सालेकसा तालुक्याच्या पिपरिया बीटवर वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान त्यांनी अनेक वेळा लाकूड तस्करी करणाऱ्या लाकूड चोराना रंगेहात पकडून कारवाई केली. पिपरिया क्षेत्र हे घनदाट जंगलाने व्यापलेले आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर सागवान लाकडांची तस्करी होत असते. लाकूड चोर चारचाकी किंवा दुचाकी वाहनाने सागवान सह इतर किमती लाकडाची चोरी करून बाहेर गावी नेऊन विक्री करतात. लाकूड तस्करी रात्रीच्या वेळी होत असते. त्यामुळे वनरक्षक जचपेले रात्री गस्त देऊन अनेक वेळा लाकूड चोरांना पकडून कारवाई करीत होते. २३ मे रोजी नेहमीप्रमाणे रविंद्रसिंग सकाळी १० वाजता कर्तव्यावर गेले दिवसभर आपल्या क्षेत्रात वनाची पाहणी करीत लाकूड चोरांनां यशस्वी होऊ न देता रात्री ९ वाजता कर्तव्य बजावत घरी येण्यासाठी निघाले. पिपरिया वरून सालेकसाकडे येत असताना निंबा आणि पिपरिया दरम्यान खडखडीटोला नजीक वाहात असलेल्या नाल्या जवळ त्याच्यावर उभारीने हल्ला करून ठार करण्यात आले. त्यामुळे रविंद्रसिंह जागीच मृत्यू झाला आहे.
रविंद्रसिंह रात्री घरी पोहोचले नाही तेव्हा त्याचे भाऊ सुरेंद्र जचपेले हे माहितीसाठी पिपरीयाकडे गेले. रस्त्यावरच त्यांना रविंद्रसिंहचा मृतदेह नाल्या लगत शेतात पडलेला असल्याचे सांगण्यात आले. त्याची मोटारसायकल नाल्याच्या किनाऱ्यावर उभी होती. जेव्हा सुरेंद्र वस्तुस्थिती जाणण्यासाठी गेले असता त्याला रविंद्रसिंहचा मृतदेह उघडा पडला होता. सदर घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.