कान्होबाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 08:36 PM2020-08-13T20:36:53+5:302020-08-13T20:37:15+5:30
कान्होबाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील गंगाझरी येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कान्होबाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील गंगाझरी येथे घडली. देवदास उरकुडा उईके (६०) व रजनिश प्रदीप वानखेडे (२६) रा. गंगाझरी असे तलावात बुडून मृत्यू झालेल्यांची नाव आहे.
जिल्ह्यात जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. जन्माष्टमीनिमित्त मंगळवारी घरोघरी श्रीकृष्णाच्या मूतीर्ची स्थापना करण्यात आली होती.त्यानंतर गुरूवारी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.अनेक भाविकांनी आपल्या परिसरातील नदी आणि तलावांमध्ये कान्होबाचे विसर्जन केले. जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने नदी नाले भरुन वाहत आहे. दरम्यान गंगाझरी येथील देवदास उईके व रजनिश वानखेडे येथे गावालगत असलेल्या खोड्या तलावावर कान्होबा विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा तोल गेल्याने ते दोघेही तलावातील खोल पाण्यात बुडाले. तलावावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर स्थानिक मासेमारांच्या मदतीने तलावात या दोघांचा शोध घेण्यात आला. सायंकाळी ७: ३० वाजताच्या सुमारास दोघांचे मृतदेह मिळाले. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.