दोघींच्या विनयभंगाबद्दल दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By admin | Published: June 11, 2017 01:06 AM2017-06-11T01:06:54+5:302017-06-11T01:06:54+5:30
कटंगीकला येथील दोन कुटूंबात झालेल्या वादात दोन महिलांचा विनयभंग करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कटंगीकला येथील दोन कुटूंबात झालेल्या वादात दोन महिलांचा विनयभंग करण्यात आला. विनयभंग वरून झालेल्या वादात दोन गटातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपीक प्रदीपकुमार उंदल भिमटे (५३) याने कटंगीटोला येथील २६ वर्षाच्या महिलेला घरी एकटी पाहून तिचा विनयभंग केला. मी पोलीस अधिक्षक कार्यालयात आहे. माझे कुणीही काही बिघडवू शकत नाही असे त्याने म्हटले. माझ्या मधात येणाऱ्यांना अॅट्रासिटी कायद्यात अडकविण्याची धमकी दिली. त्या महिलेचा विनयभंग करून गळा आवळून ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणात प्रदीप भिमटे व शालू कमलेश कावळे (२८) या दोघांवर भादंविच्या कलम ३५४ अ, ४५२, ५०४, ५०६ (ब) ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गटातील पोलीस हवालदार अर्जुन कावळे याने २८ वर्षाच्या महिलेला लैगिक संबंधाची मागणी करून तिचा विनयभंग केला. तसेच राजेश कावळे व नरेश कावळे या दोघांनी त्याच्या घराच्या काचा दगडानी फोडल्या. अश्लील शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली.
या प्रकरणात अर्जुन कावळे, राजेश कावळे, नरेश कावळे या तिघांवर भादंविच्या कलम ३५४ अ, ४५२,३४१,२९४, ५०६ (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील आरोपींना अटक झाली नव्हती.