बीएच्या परीक्षेपासून दोनदा विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2016 02:01 AM2016-04-06T02:01:23+5:302016-04-06T02:01:23+5:30
गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील मणिभाई ईश्वरभाई पटेल महाविद्यालयातून बीए-२ च्या परीक्षेसाठी छोटा गोंदिया परिसरातील रहिवासी ...
ऐकणारासुद्धा कुणी नाही : प्राध्यापकाने दिला विद्यार्थ्यालाच दोष
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील मणिभाई ईश्वरभाई पटेल महाविद्यालयातून बीए-२ च्या परीक्षेसाठी छोटा गोंदिया परिसरातील रहिवासी कशिश जियालाल चंद्रिकापुरे याने आवेदन केले होते. मात्र त्याची हॉल तिकीट आली नाही. त्यामुळे तो परीक्षा देण्यापासून वंचित राहिला. या प्रकरणात ज्या प्राध्यापकावर आरोप लावला जात आहे, ते सदर विद्यार्थ्यालाच यात दोषी असल्याचे सांगतात.
कशिश चंद्रिकापुरे याने बारावीची परीक्षा खमारीच्या शाळेतून उतीर्ण केली व सोनी येथील सदर महाविद्यालयात बीए-१ मध्ये प्रवेश घेतला. याच महाविद्यालयातून त्याने बीए-१ ची परीक्षा दिली. परीक्षेत त्याचे काही विषय बाकी राहिले. या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी त्याने आॅगस्ट २०१५ मध्ये परीक्षेचे आवेदन केले. त्याने आवेदनासह आवश्यक फीससुद्धा जमा केली. आॅक्टोबर २०१५ मध्ये जेव्हा तो परीक्षेसाठी हॉल तिकीट घेण्यास गेला तर परीक्षा फार्म भरण्याचे कार्य करणाऱ्या कर्मचारी बी.ए. जांगडे यांनी सांगितले की, त्याची हॉल तिकीट आली नाही. त्यांनी कशिशला सांगितले की, फार्म भरण्याची निविदा एका कंपनीला देण्यात आली व त्या कंपनीने फार्म भरण्यात चूक केली. एवढेच नव्हे तर कशिशला सांगण्यात आले की त्याला आता आवेदन करण्याची गरज नाही. त्याची फीससुद्धा जमा आहे. त्याला आता हॉल तिकीट घेण्यास व परीक्षा देण्यास यायचे आहे.
आता तो परीक्षेची हॉल तिकीट घेण्यास गेला तर त्याच प्राध्यापकाने सांगितले की, त्याने आवेदनच केले नाही. याबाबत त्याला समझाविण्यासाठी प्रा. जांगडे यांनी त्याला आपल्या घरी बोलाविले. विद्यार्थी कशिश २ एप्रिल रोजी जांगडे यांच्या घरी गोरेगाव येथे गेला होता. परंतु त्यांच्याशी चर्चा होवू शकली नाही. प्रश्न त्या विद्यार्थ्याचा एक वर्षे व्यर्थ जाण्याशी निगडीत आहे. कशिशच्या म्हणण्यानुसार, तो एकटाच नाही तर असे अनेक विद्यार्थी आहेत जे परीक्षा देण्यापासून वंचित राहिले आहे. त्या विद्यार्थ्यांना समझाविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत चौकशी केल्यावर जांगडे यांनी सांगितले की, त्या विद्यार्थ्याने टीसी दिली नव्हती. परंतु जेव्हा त्यांना आठवण करून देण्यात आली की त्याने याच महाविद्यालयातून आधी परीक्षा दिली आहे, तेव्हा जांगडे यांनी फोन बंद केला व दुसऱ्यांदा फोन केल्यावरही उचलला नाही. दरम्यान याच महाविद्यालयाच्या एका दुसऱ्या कर्मचारी शहारे यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी म्हटले की, त्या विद्यार्थ्यांसह चांगले झाले नाही. परंतु यापेक्षा अधिक माहिती त्यांच्याकडे नसल्याचे सांगत त्यांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याचे बीए-२ मध्ये प्रवेश झाले आहे.
परंतु दोन परीक्षा तो सदर कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे देवू शकला नाही. त्यामुळे त्याचे वर्ष वाया गेले. (प्रतिनिधी)